नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या बागलाण (Baglan) तालुक्यातल्या आरम नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. गणेश रामचंद्र जगताप (वय 32) आणि रोशन देवेंद्र बागुल (वय 18) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही चाफ्याचा पाडा (देवपूर) येथील रहिवासी आहेत. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरलीय. हे दोघेही कपडे धुण्यासाठी घरातील महिलांसोबत गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून (drown) मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. सध्या केळझर नदीपात्रातून आरम नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. हे रब्बीसाठीचे शेवटचे आवर्तन असल्याचे समजते. त्यामुळे नदीला पाणी आले. हे पाहून जगताप कुटुंब घरातील महिलांसह कपडे धुण्यासाठी नदीपात्रावर गेले. घरातील महिलांनी कपडे धुतले. त्यानंतर त्या घरी निघाल्या. मात्र, गणेश आणि रोशन हे मामा-भाचे अंघोळीसाठी म्हणून दोघेच नदीवर थांबले. ते दहिंदुले येथील बंधाऱ्यात उतरले होते.
गणेश-रोशन हे मामा भाचे पोहण्यासाठी बंधाऱ्यात उतरले. मात्र, यापूर्वी खूपच कमी पाणी होते. आता केळझर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने पाणी वाढले होते. याचा अंदाज या दोघांना बांधता आला नाही. ते पात्रात उतरले. पाणी कमी समजून दूरवर चालत गेले. मात्र, येथेच त्यांचा घात झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याचे समोर येत आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश आणि रोशन यांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर चाफ्याचा पाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यातील रोशन याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याला आता निकालाचे आणि पुढील करिअरचे वेध लागले होते. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच सटाणा पोलीस ठाण्याचे हवालदार जे. ए. सोळंकी, जे. डी. लव्हावेर, पोलीस नाईक एन. एस. भोये यांनी या ठिकाणी भेट दिली. या प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
इतर बातम्याः