नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रचंड चुरस वाढली आहे. काँग्रेस नेते सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सत्यजित तांबे यांना भाजपची फूस असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला धडा शिकवण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शुभांगी पाटील या भाजपच्याच कार्यकर्त्या होत्या. त्यांनाच आता महाविकास आघाडीने मैदानात उतरवल्याने चुरशीची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शुभांगी पाटील यांनी भाजपकडून तिकीट मागितले होते. भाजपने त्यांना उमेदवारीही दिली. पण भाजपकडून त्यांना उशिरा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतरही भाजपने त्यांना पाठिंबा दिला नाही.
उलट सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले. त्यामुळे ठाकरे गटाने पुढाकार घेऊन शुभांगी पाटील यांनाच तांबेंविरोधात उभं केलं आहे. तांबे यांना ललकारणाऱ्या शुभांगी पाटील कोण आहेत? त्यावर टाकलेला हा प्रकाश.
शुभांगी पाटील या पेशाने शिक्षिका आहेत. त्या धुळ्याच्या भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीए डीएड, एमए, बीएड, एललबीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्या महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन राज्य अध्यक्षा आणि संस्थापिका आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनच्या संस्थापिका अध्यक्षाही आहेत.
महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत. त्याशिवाय नंदूरबारच्या मोलगी येथील ग्रामविकास मंडळाच्या सचिवही आहेत. जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्था आणि धुळ्याच्या युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीच्याही त्या अध्यक्षा आहेत.
भाजपातून दोनच महिन्यातच शुभांगी पाटील ठाकरे गटात आल्या आहेत. शुभांगी पाटील यांचे भाजपातील जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर शुभांगी पाटील ट्रोल होत आहेत.
आपण भाजपकडूनच लढणार असल्याचा शुभांगी पाटील यांनी दावा केला होता. मात्र भाजपकडून ठेंगा मिळताच शुभांगी पाटील ठाकरे गटात आल्या. शुभांगी पाटील आता ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार आहेत.
पाटील या गेल्या 10 वर्षांपासून शिक्षकांसाठी काम करत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची त्या गांभीर्याने दखल घेतात. त्यामुळेच त्यांनी आझाद मैदानावर शिक्षकांच्या प्रश्नांवर सात दिवसाचं उपोषण केलं होतं. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत काम केलं होतं.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन या संस्थेची स्थापना करून स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबर 2022 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.