नाशिकः तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या भूमाफियाला दिल्ली (Delhi) पोलिसांनी (Police) नाशिकमध्ये (Nashik) बेड्या ठोकल्या आहेत. पीयूष तिवारी असे त्याचे नाव आहे. तिवारीने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या माध्यमातून घोटाळा केला आहे. त्याच्यावर या तीन राज्यांमध्ये जवळपास 37 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्ली पोलिसांनी रात्रीचा दिवस केला होता. तिवारीच्या अटकेवर 50 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. अखेर त्याला पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन उचलले. त्याच्यासोबत इतर कोण-कोण या गुन्ह्यात आहेत याचा छडाही पोलीस आता लावणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तो नाशिकमध्ये रहात होता. याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी ही कारवाई केली. याबद्दल दिल्ली पोलिसांचे कौतुक होत आहे. उशिराने का होईना सराईत गुन्हेगार ताब्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त होतेय.
नाशिकमध्ये नाव बदलून लपला
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जमीन घोटाळा केल्यानंतर पीयूष तिवारीच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. साधरणतः 2016 ते 2018 मध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिवारी महाराष्ट्रात आला. त्याने थेट रमणीय अशा नाशिकमध्ये आपले बस्तान बसवले. त्यासाठी आपले नाव बदलले. पीयूष तिवारी ऐवजी लोकांना तो पुनीत भारद्वाज हे नाव सांगायचा. विशेष म्हणजे पीयूष तिवारीच्या गोरखधंद्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याला मदत केल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पत्नीलाही बेड्या ठोकल्यात. ती सध्या तुरुंगात आहे.
120 कोटींची रोकड सापडली
पोलिसांनी पीयूष तिवारीला नाशिकमध्ये बेड्या ठोकताच हिसका दाखवला. त्यानंतर त्याने पोपटाप्रमाणे बोलणे सुरू केले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 2011 मध्ये 8 शेल कंपन्या तयार केल्या. तर 2018 पर्यंत त्याने एकूण 15 ते 20 शेल कंपन्या तयार केल्या. 2016 मध्ये त्याच्या घरावर आयकरने छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे 120 कोटींची रोकड सापडली होती. या कारवाईनंतर त्याला जोरदार झटका बसला. तो अनेक एजन्सींच्या डोळ्यांवर आला. यातून बाहेर पडण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी त्याने लोकांना गंडवणे सुरू केले.
एकच फ्लॅट अनेकांना विकला
पीयूष तिवारी फक्त एकच फ्लॅट खरेदी करायचा. विशेष म्हणजे तो हाच फ्लॅट अनेकांना विकायचा. त्यातून त्याने अनेकांना गंडा घातला. त्याच्याविरोधात दिल्लीसह अनेक भागात गुन्हे दाखल झाले. तेव्हा त्याने तिथून पलायन केले. तिवारी पूर्वी एक जाहिरात कंपनीही चालवायचा. डीसीपी सागर प्रीत कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पथक गेल्या अनेक दिवसांपासून तिवारीच्या मागावर होते. तेव्हा 20 मार्च रोजी हा भामटा नाशिकमध्ये नाव बदलून रहात असल्याचे समजले.
कसा सापडला जाळ्यात
दिल्ली पोलिसांचे पथक नाशिकमध्ये आले. तेव्हा त्यांना पीयूष तिवारी कांदा आणि अन्न पुरवठ्याच्या कामात उतरल्याचे दिसले. मग पोलिसांनी सगळ्या कांदा व्यापाऱ्यांची यादी तयार केली. तेव्हा त्यांना पुनीत भारद्वाजची खबर लागली. हीच व्यक्ती पीयूष तिवारी असल्याचा संशय आला. त्यांनी खातरजमा केली, तेव्हा हे खरे ठरले. आणि अखेर तिवारीला उचलण्यात आले.