शैलेश पुरोहित, इतगपुरीः मुंबई – आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करावे, अशी महत्वाची सूचना राज्यपाल (Governor) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केली आहे. राज्यपाल नाशिक (Nashik) दौऱ्यावर असताना इगतपुरी विश्रामगृहातील अभिप्राय पुस्तकात त्यांनी ही सूचना केली आहे. महाराष्ट्र सरकार याबाबत निश्चितपणे योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून ह्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. राज्यपालांनी केलेल्या महत्वाच्या सूचनेचे इगतपुरी तालुक्यातील विविध भागातून स्वागत सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. नाशिकच्या गुणवान खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. शिवाय काळाराम मंदिरात जात दर्शन घेतले.
इगतपुरी तालुका राज्याचे आणि मुंबईचे प्रवेशद्वार आहे. यासह ह्या तालुक्यात मोठ्या गतीने पर्यटन आणि पर्यटक वाढत आहेत. त्र्यंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग, प्रभू रामाच्या वास्तव्याने पावन झालेले नाशिक, भंडारदरा धरण, सप्तशृंगी देवी, शिर्डी आदी महत्वाच्या ठिकाणांसाठी इगतपुरी हे केंद्र आहे. त्यानिमित्ताने पर्यटनाच्या सुविधा वाढत आहेत. तथापि सामान्य नागरिक आणि पर्यटक यांच्यासाठी शासनाकडून पाऊल उचलणे आवश्यक आहे. याबाबत नेहमीच अनेक नागरिकांकडून विविध मागण्या होत असतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विश्रामगृह विस्तारीकरण करण्याची सूचना केली आहे. ह्या सूचनेचे इगतपुरी तालुक्यात स्वागत करण्यात येत आहे.
इगतपुरी येथील शासकीय विश्रागृहाचे विस्तारीकरण झाल्यास विविध सुविधायुक्त खोल्या सामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी उपलब्ध होतील. सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी 2 सूट आहेत. मात्र, मुंबई जवळ असल्याने ते नेहमीच फुल्ल असतात. आता या ठिकाणच्या खोल्या वाढवल्या, तर सामान्यांची सोय होईल. राज्यपालांच्या सूचना असल्यामुळे हे काम लवकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, ते कधी होणार, हे येणारा काळच सांगेल.