शैलेश पुरोहित, इगतपुरीः इगतपुरी येथील त्रिंगलवाडी हद्दीतील माउंटशाडो या नामांकित हॉटेलवर रात्री 2 वाजता नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी (Police) छापा मारून हुक्का पार्टी (Hookah party) उधळून लावली. हॉटेलमधील जवळपास 70 जणांना इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माउंट शाडो हॉटेलमध्ये अनेकदा हुक्का पार्टी रंगायच्या. शनिवारी रात्रीही येथे हुक्का पार्टी रंगल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. तेव्हा यावेळी जवळपास वीस ते पंचवीस महिला आणि पन्नास ते पंचावन्न पुरुष एकत्र येऊन हुक्का पार्टी करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. नाशिकमध्ये यापूर्वी अनेक हुक्का पार्टीवर पोलिसांनी छापे मारले आहेत. मात्र, हुक्क्याचे शौकीन प्रत्येक वेळी वेगळे ठिकाण निवडतात. यात बहुतांश तरुण मुले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर ही व्यसनाधीनता रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
‘ती’ पार्टी अजूनही चर्चेत
इगतपुरीतील एका हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी छापा मारला होता. त्यावेळी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळसह 22 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे ही कारवाईही शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती. ही पार्टी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला बंगल्यात सुरू होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर नशेत तल्लीन होते. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचे सेवन सुरू होते.
पाटील पुन्हा आक्रमक
नाशिक ग्रामीण पोलीसचे अधीक्षक सचिन पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्टी, अवैध गुटखा प्रकरणांमध्ये आतापर्यंत जोरदार कारवाई केली आहे. त्यांनी रोलेट किंगचा पर्दाफाश केला. अवघ्या काही महिन्यांत पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे जनसामान्यांत त्यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख झाली होती. शेतकऱ्यांना फसविणारा व्यापारी वर्ग, रोलेटचा जुगार चालविणारे, भूमाफिया या साऱ्यांना पाठिशी घालणारे राजकारणी यांच्या नाड्या पाटील यांनी आवळल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदलीही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नागरिकांनी आंदोलन उभे केले. त्यांची बदली हाणून पाडली. त्यानंतर पाटील पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत.
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?