नाशिकः तुम्ही विहीर चोरीला गेल्याचे चित्रपटात पाहिले असेल. पाऊस पडला नाही म्हणून हवामान विभागावर तक्रार दाखल केल्याची बातमी वाचली असेल. आता त्यावरचा कडेलोट म्हणजे नाशकातून (Nashik) एक-दोन नव्हे, तर चक्क शेकडो नाले (Nashik Drainage) चोरीला गेल्याचे समोर येत आहे. महापालिकेने यातले जवळपास 63 नाले शोधल्याचे समजते. मात्र, उर्वरित नाले गेले कुठे याचा शोध सुरू असून, तो कधी संपेल माहित नाही.
या रंजक चोरीची माहितीही तितकीच रंजक आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक नाल्यांचा विषय चर्चेत आहे. यातले अनेक नाले विकासकांनी गिळंकृत करून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. काही ठिकाणी नाले बळकावण्याचे आणि बुजविण्याचे षढयंत्र सुरू आहे. महापालिकेने यातले 63 नाले शोधून काढले आहेत. याचेही झाले असे की, या नाल्यांची महापालिकेच्या 2017 मध्ये केलेल्या शहर विकास आराखड्यात नोंद आहे. त्यामुळे प्रशासन उशिरा का होईना जागे झाले असून, सध्या ज्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत 63 पैकी 22 नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
महापालिकेचे गांधी भवन नाल्यावरच
तळे राखणारा पाणी चाखणार या म्हणीप्रमाणे महापालिकेचे राजीव गांधी भवनच हे चक्क नाल्यावर बांधले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात महापालिकेसमोर तळे साचते. सोबतच पालिकेनेच नाळा बळकावल्याने ती इतरांना काय सांगणार आणि काय कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इथेही गडबड, इथेही घोटाळा
महापालिकेपासून फर्लांगभर असलेल्या पोलिस अकादमीजवळून गेलेला नालाही गायब झाला आहे. हा नाला विसे मळ्यातून गंगापूर रोडकडे जायचा. मात्र, तो सुद्धा शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. नाशकातील चोपडा नाला, सरस्वती नाला, वाघाडी नाल्यासह अनेक नाले बुजवले गेलेत. सिडकोतूनही अनेक नाले गायब झाल्याचे समजते.
सर्व काही संगनमताने
नाशकात यापूर्वी कितीही पाऊस झाला, तर पाणी तुंबत नसे. मात्र, शहरीकरणाने वेग घेतला. विकासकांचा सुळसुळाट सुरू झाला. त्यानंतर महापालिका नगररचना विभागाच्या आशीर्वादाने विकासकांनी मलईदार जागेसाठी फिल्डिंग लावत चक्क नाले बुजवून इमारती उभारल्या. याचा व्हायचा तो परिणाम झालाच. २००८ मध्ये नाशकाला पुराचा वेढा पडला. अगोदर अनेक ठिकाणी अरूंद झालेली गोदामाय आणि त्यात बळकावलेल्या नाल्यावर उभारलेल्या इमारतीने अख्ख्या नाशकाचे तळे झाले. आता थोडाही जास्तीचा पाऊस आला, तर थेट महापालिकेपासून ते शहरातील कित्येक भागात तळे साचते.
उशिरा आलेल्या जागेचे स्वागत
खरे तर 2017 मधल्या शहर विकास आराखड्यात शहरात फक्त ६३ नाले झाल्याचे आढळून आले. त्यानंतर गायब झालेल्या शेकडो नाल्याचे सर्वेक्षण आणि शोध घ्यायलाही महापालिकेला तीन वर्षे जाऊ द्यावे लागले. महापालिकेने सुरू केलेल्या नाल्याच्या सर्वेक्षणाचे पर्यावरण तज्ज्ञांनी स्वागत केले असून, ही प्रक्रिया गतीने करावी. नाले शोधून ते पूर्ववत करावे. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करावे. तरच आगामी काळात शहर तुंबणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या
नाशिकमध्ये पालिका निवडणुकीआधी मनसे सक्रीय, प्रत्येक मनसैनिकाच्या घरावर झेंडा फडकावणार
मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी तुमचा संबंध काय?; किरीट सोमय्यांचा भुजबळांना सवाल