चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या एका कार्यक्रमामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे तिच्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही. राडा झाला नाही. पोलिसांना लाठीमारही करावा लागला नाही. कार्यक्रमाची रितसर परवानगीही होती. पण तरीही तिचा हा कार्यक्रम वादात अडकला आहे. थेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या कार्यक्रमाची दखल घेऊन प्रचंड संतापले आहेत. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम शाळेच्या मैदानात झाल्याने हा वाद रंगला आहे. शिक्षण मंत्र्यांनी तर गौतमीला शाळेत नाचवणाऱ्यांना घरी बसावे लागेल असा इशारा दिला आहे. मात्र, या घटनेची चौकशी केली असता भलतीच गोष्ट बाहेर आली आहे. त्यामुळे शिक्षण मंत्रीच तोंडघशी पडल्याची चर्चा आता रंगली आहे.
27 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील वलखेड गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. एरव्ही गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होत असतो. मात्र हा कार्यक्रम शांततेत पार पडला. तरी देखील वलखेड गावातील हा कार्यक्रम सध्या वेगळ्याच आरोपांनी घेरला गेलाय. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेत झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आणि यामुळे कार्यक्रमाचे आयोजक वादात सापडले.
वलखेड गावातील एकता युवक मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाला परिसरातील तरुण युवक, महिलांनी गर्दी केली. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी या कार्यक्रमात सुदैवाने झाली नाही. गोंधळ न होता हा कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र समाज माध्यमांमध्ये हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात झाल्याची चर्चा सुरू झाली आणि यामुळे वाद निर्माण झाला. हा मुद्दा थेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पर्यंत गेला. गौतमीला शाळेत नाचवणारे घरी जातील असा इशारा त्यांनी दिला.
मात्र प्रत्यक्षात हा कार्यक्रम वलखेड ग्रामपंचायतच्या मालकीच्या खुल्या जागेवर झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. एकता मित्र मंडळाने या कार्यक्रमाची आणि मैदानाची पोलिसांकडून तसेच ग्रामपंचायतकडून रीतसर परवानगी घेतली होती. त्याचप्रमाणे रीतसर भाडे देखील देण्यात आले होते, असा दावा आयोजकांनी केलाय. माध्यमांना कुणीतरी चुकीची माहिती देऊन गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एकता युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि वलखेडचे सरपंच विनायक शिंदे यांनी केलाय.
सार्वजनिक ठिकाणी होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम यात वावगं काहीही नाही. मात्र अशा रीतीने चांगल्या कार्यक्रमाला बदनाम करणं हेही चुकीचं आहे. या प्रकरणात नाहक गाव आणि कार्यक्रमाचे आयोजक बदनाम होत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात नक्की खरं काय आणि खोटं काय, याची चौकशी शिक्षण विभागाने केली. कार्यक्रम झालेली जागा ही ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेचा आणि त्या जागेचा काहीही संबंध नाही. तसेच या शाळेचा विकास pernod ricard या कंपनीच्या सीएसआर फंड मधून करण्यात आलाय. ही शाळा कुठल्याही प्रकारे दत्तक घेतली नसल्याचे स्पष्टीकरण देखील शिक्षण विभागाने दिले. त्याचप्रमाणे हा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.