नाशिक : लग्न सोहळ्यावरुन परतताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका बालिकेसह तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदगाव-मालेगाव रस्त्यावर नाग्या-साक्या पुलावर मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. कारमधील सर्वजण मालेगावहून जालना येथे एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. तेथून मालेगावला परतत असताना हा अपघात घडला.
नाशिकच्या नांदगाव मालेगाव रोडवर नाग्या-साक्या धरणाच्या समोरील नदीच्या पुलाला कठडे नाहीत. यामुळे अपघाताच्या घटना येथे घडत असतात. जालना येथून एका विवाह सोहळ्याला गेलेले नातेवाईक मालेगावकडे परतत असताना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. पुलाला कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात चालकाच्या काही लक्षात आले नाही. गाडी पुलावरुन थेट नदीत कोसळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर एका दुचाकीचा आणि तीन चाकी टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यावरून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने भरधाव वेगात एक दुचाकी जात होती. तितक्यात विरुद्ध दिशेने तळेगाव शहराकडे जाणाऱ्या एका तीन चाकी टेम्पोला दुचाकीची जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीं दुचाकीस्वाराला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.