नाशिकः नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला म्हणत नाशिकमध्ये (Nashik) मुस्लिम नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह इतर मुस्लिम नगरसेवक राज ठाकरे यांची उद्या मुंबईत भेट घेणार आहेत. मशिदींवर भोंगे लावलेच नसते, तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. मशिदींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही नगरसेवक सलीम शेख यांनी केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतिर्थावर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या (masjid) बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा दिला होता. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशिदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असे आवाहन केले होते. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झालीय.
पुण्यात मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलीय. वसंत मोरे हे कात्रजमधून गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. ते जातीने मराठा आहेत. मात्र, त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठिशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मते आहेत आणि हीच मते गेमचेंजर ठरतात. त्यामुळे ते राज यांच्या भूमिकेशी सहमत नाहीयत. भोंग्याच्या प्रकरणावरून पुण्यात मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी राजीनामाही दिला आहे.
नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय आक्रमक झालेत. त्यांनी डीजे आणि लाऊडस्पीकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत आहोत. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. एखाद्याने शातंता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक करावाई करण्यात येईल, असा इशारा पांडेय यांनी दिला आहे. मशिदीवरील भोंगा प्रकरणावरून मनसेतही दोन गट पडल्याने गोंधळाचे वातावरण आहे.