नाशिकः लेटर बॉम्ब फोडून महसूल खाते, महसूल मंत्र्यांना घाम फोडणारे नाशिकचे (Nashik) पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांना आता बदली हवी आहे. विशेष म्हणजे या वादग्रस्त पत्रापत्रीपूर्वीच त्यांनी बदलीची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता कोण येणार याची चर्चा रंगली आहे. सध्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, बृहनमुंबईचे सहआयुक्त संजय दराडे, ठाण्याचे दत्ता कराळे, मुंबईचे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद आणि पुण्याचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिवसे या अधिकाऱ्यांपैकी कोणाची तरी एकाची नाशिकला बदली होऊ शकते, या चर्चेने जोर धरलाय. नाशिकचे पोलीस आयुक्तालय आयजीपी रँकचे आहे. सध्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यांत त्यांची बदली होऊ शकते. हे ध्यानात घेता त्यांना नाशिकला पदोन्नती मिळेल याची जोरदार चर्चा आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी गेल्याच वर्षी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, आयजीपी रँकमुळे त्यांनाही पदोन्नती मिळू शकते. तसे झाल्यास त्यांचीही नाशिकला बदली होऊ शकतो, अशी चर्चा रंगते आहे. मात्र, खरेच सध्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदलीची विनंती स्वीकारली जाणार का, हे पाहावे लागेल. पांडेय यांची कारकीर्द नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहिली आहे.
दीपक पांडेय यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून 4 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांच्या नाना भूमिका चर्चेत राहिल्या आहेत. नुकतीच गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत समितीला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. त्यानंतरही नाशिकमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि वादाचा धुरळा उठला. त्यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र चांगले गाजले. त्यात त्यांनी महसूल अधिकारी ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. महसूल अधिकारी त्यांच्या कह्यात आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे द्यावेत, अशी मागणी केली आहे.
दीपक पांडेय यांनी हा लेटर बॉम्ब टाकल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पांडेय यांनी सपेशल माफी मागितली. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही सांगितले. थोरातांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा इशारा दिला होता. आता या लेटर बॉम्बपूर्वीच पांडेय यांनी बदलीची मागणी केल्याचे समोर आले आहे. मग बदलीची मागणी आणि लेटर बॉम्ब हे सारे सुनियोजित होते का, अशी चर्चाही रंगताना दिसतेय. दुसरीकडे तहसीलदार यांनी पांडेय यांच्या भूमिकेबद्दल दंड थोपटत त्यांच्या कारवाई करण्याची मागणी केलीय.