नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येवल्यात अगदी कमी शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. याच आरोपांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंजही दिलं आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भाषण केलं तेव्हा शरद पवार यांना वय झालं, राजकारणातून निवृत्त कधी होणार? असं म्हणत निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
“दहा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही आरोप केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे आरोप केले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्या आरोपांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले”, असं शरद पवार म्हणाले.
“माझं जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ते शिक्षा द्या. त्यासाठी आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील”, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.
“काही लोक म्हणाले, तुमचं वय झालं, तुम्ही आता निवृत्त व्हा. वय झालं हे खरं आहे. वय 82 झालं हे खरंय. पण गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे? अजून तर… जास्त सांगायची गरज नाही. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल”, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
“पुन्हा असा विचार करु नका. धोरणांवर टीका करा, कार्यक्रमांवर टीका करा. पण वय आणि वैयक्तिक हल्ला या गोष्टी आम्हाला कुणी शिकवलेली नाहीत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी आम्ही वाढलो. त्या विचारांमध्ये व्यक्तिगत हल्ले झालेले नाहीत”, असं शरद पवार म्हणाले.
“आमची एकच तक्रार आहे, ज्या जनतेने निवडून दिलं, ज्या जनतेने विश्वास ठेवला, त्या विश्वासाला तडा बसेल असं पाऊल तुम्ही टाकलं असेल तर ती गोष्ट आम्ही सहन करणार नाही. ती गोष्ट कुणी करत असेल तर त्यांना आज ना उद्याचा त्याची किंमत द्यावी लागेल”, अशा शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.