चंदन पुजाधिकारी, Tv9 मराठी, नाशिक | 20 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राट भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. कंत्राटी भरतीचा जीआर हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन अतिशय आक्रमकपणे महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.
धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीच्या सरकार काळातही मंत्री होते. पण त्यावेळी कंत्राट भरतीचा जीआर काढला तेव्हा आपलं ऐकलं गेलं नाही, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. “काही दिवसांपासून कंत्राटी पद भरती संदर्भात काही पक्ष गदारोळ करत होते. पहिल्यांदा 2003 मध्ये कंत्राटी पद्धतीने कंत्राटी भरती सुरू झाली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू झाली. कंत्राटी पद्धतीने भरती टेंडरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली”, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
“कंत्राटी पद्धतीने भरतीची ही पूर्ण प्रक्रिया महाविकस आघाडी सरकार असताना झाली. ही संपूर्ण कंत्राटी भरतीचे पाप माहाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. आमच्या सरकारकडून हे निर्णय रद्द करण्यात आले. यापुढे सरकारी पद्धतीने भारती होणार आहे. सर्वच्या सर्व जागा सरकारी पद्धतीने भरती केले जाणार आहेत. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा होता”, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंत्राटी भरतीवरुन महाविकास आगाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अन्यथा आंदोलन करणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या भूमिकेला सहमती दर्शवली आहे. “भाजपाने उद्या दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आमचा पाठिंबा आहे. यांना लाज वाटली पाहिजे, आमच्यावर आरोप करण्याचं पाप तुम्ही केल्याचं मान्य करा”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
यावेळी धनंजय मुंडे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर देखील भूमिका मांडली. “मराठा आरक्षण मिळावं यासाठी मी 98 पासून त्या चळवळीत आहे. मी ना मराठा, ना कुणबी तरी मी त्या चळवळीत आहे. ते काय म्हणाले माहिती नाही. पण मराठा आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका आहे. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केलं. बोरवेल आणि विहिरी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. चाऱ्याबाबत अजून काही गंभीर स्थिती नाही. सरकारकडून आढावा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.