सुप्रिया सुळे यांचं येवल्याच्या नागरिकांना 3 मोठी आश्वासनं, ‘आमचे आमदार निवडून दिले तर….’

| Updated on: Jul 08, 2023 | 6:13 PM

खासदार सुप्रिया सुळे यांनी येवल्याच्या नागरिकांना तीन महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या गटाचे आमदार आणि खासदार निवडून दिले तर मतदारांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करु, महागाई कमी करु, असं आश्वासनं सुप्रिया सुळे यांनी दिलं.

सुप्रिया सुळे यांचं येवल्याच्या नागरिकांना 3 मोठी आश्वासनं, आमचे आमदार निवडून दिले तर....
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. येवला हा भाग मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शरद पवार यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला येवल्यातूनच सुरुवात केली आहे. येवल्यात शरद पवार यांचं भाषण सुरु होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी येवल्याच्या नागरिकांना आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या गटाच्या आमदार आणि खासदारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी येवलेकरांना 3 मोठी वचन दिली.

“माझं केंद्र सरकार आणि भाजपसोबत कांद्याच्या भावावरुन भांडण झालं आहे. जगात कांदा कमी आहे आणि भारतात जास्त कांदा पिकला. मी पार्लमेंटमध्ये आणि ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना 50 वेळा सांगितलं की परदेशात कांदा जाऊद्या. पण भाजपने ते जाऊ दिलं नाही. शेतकऱ्यांचं भाव न मिळाल्याने कंबरडं मोडलं असेल तर भाजप जबाबदार आहे. शहरात टमाटरला भाव किती आहे माहिती आहे का? तुम्हाला भाव देत नाही तिकडे शहरात सर्वसामान्यांना परवत नाही. मग मधला पैसा जातो कुठे?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

“मी तुम्हाला दुधाचं उदाहरण देते. परदेशातून दूध येणार होतं पण शरद पवार यांनी विरोध केल्यानंतर सरकारने परदेशातून दूध घेणार नाही, असा निर्णय घेतला”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “आज ते गेले आहेत सगळे भाजपमध्ये, त्यांचा तो अधिकार आहे. आज महागाईची काय परिस्थिती आहे. सिलेंडरचा भाव परवडतोय का? राष्ट्रवादीचं सरकार असताना सिलेंडरचा भाव 350 रुपये इतका होता”, असंही सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांचे येवल्याच्या नागरिकांना तीन वचन

“येवल्यात गेल्या 15 वर्षात किती नव्या फॅक्ट्री आल्या का? मी तुम्हाला शब्द देते. शरद पवार यांचा विचारांचा आणि निष्ठा ठेवेल, त्यांच्या चौकटीतील शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींचा विचार करेल, असा आमदार निवडून द्या. तुमच्या कांद्याला भाव देऊ. तसेच इंडस्ट्रीसुद्धा आणू”, असं मोठं वचन सुप्रिया सुळे यांनी दिलं.

“आमच्या आमदारांना निवडून आणलं तर मांझरपाडाचा कॅनलचा प्रश्न आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार”, असं तिसरं वचन सुप्रिया सुळे यांनी येवल्याच्या नागरिकांना दिलं.

‘जो डर गया वह मर गया’

“सर्वसामान्य मायबाप प्रत्येकजण सांगत आहेत की, ताई तू लढ, घाबरु नको. अरे मी घाबरतच नाही. घाबरत असते तर गेले नसते का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शोले बघितलाय ना? जो डर गया वह मर गया. मला एकाने विचारलं असं कसं झालं? तुम्हाला आईसचा अर्थ समजतो का? बर्फ, त्याची स्पेलिंग म्हणजे ICE, इनकम टॅक्स, ईडी, आणि सीबीआय. जो विरोध करेल तेव्हा त्याची चौकशी. विरोध करणाऱ्याला सोबत घ्यायचं आणि वॉशिंग पावडरमध्ये टाकून धुवून काढायचं”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही’

“महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. मला मगाशी पत्रकारांनी विचारलं की, तुमच्यावर असे आरोप होत आहेत. मी इतके वर्ष काम करतेय. फक्त लोकसभेची एक जागा मिळाली. माझा विचारांशी निष्ठा आहे. मी पद मागितलं नाही. पदं येतात जातात. केंद्रात ७० मंत्री आहेत. देशाच्या शेती मंत्र्यांचं नाव काय?”, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

‘महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र, यामागे दिल्लीतील अदृश्य हात’

“एक षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात सुरु आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष सोडला, आज शरद पवार यांचा पक्ष फोडला. शरद पवार यांच्याविरोधात षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील सर्व विकास प्रकल्प दुसरं राज्यात पाठवत आहेत. हे सगळं षडयंत्र दिल्लीचा अदृश्य हात करतोय. पण आम्ही घाबरत नाही. २४ तास काम करु. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी कुणावरही विरोधात बोलणार नाही. कारण माझ्यावर मराठी संस्कार आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.