नाशिकः राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील या दौऱ्यात जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः पायाला भिंगरी लागल्यागत फिरत आहेत. त्यांनी यापूर्वी संवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाडा आणि नाशिक पिंजून काढला. आता ही यात्रा शुक्रवारी (1 ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या यात्रेत पाटील हे ग्रामीण भागातला दौरा करणार आहेत. विशेषतः सिन्नर, निफाड, येवला, देवळा येथे ते जाणार असल्याचे समजते. त्यानंतर नाशिक शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. सोबतच विभागनसभानिहाय बैठकाही ते घेतील, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीनेही ते कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा, असे आदेश देण्याची शक्यता आहे.
भुजबळ-कांदे वादावर बोलणार का?
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्रही दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी चौकशीही सुरू केली आहे. त्यात कालही आमदार कांदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नव्हे, तर प्राचार्य असल्याचा केला. याचे पुरावे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावाही केला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची फळी होती. त्यावर जयंत पाटील काही बोलणार का, याची उत्सुकता आहे.
बीडमध्ये झाले होते जंगी स्वागत
राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मराठवाडा आणि नगरमधून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बीड जिल्ह्यातील यात्रेदरम्यान त्यांचे परळीत जंगी स्वागत झाले होते. या अभूतपूर्व स्वागतामुळे जयंत पाटीलही भारावून गेले होते. माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, नाशिकमध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. या दौऱ्यात पाटील शेती नुकसानीची पाहणी करतील किंवा माहिती घेण्याची शक्यता आहे. (NCP State President Jayant Patil will guide the party workers in Nashik today)
इतर बातम्याः
आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या
ऐसी धाकड है! जिगरबाज कोमलला तिसरे सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा दबदबा