नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. यात शुक्रवारी (24 सप्टेंबर) राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसने रस्त्यावरील खड्ड्यातच श्राद्ध घालत सत्ताधारी भाजपचा अनोखा निषेध केला. (NCP Youth Congress agitation in Nashik over repair of inferior roads)
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शांत शहर असलेल्या नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डेप्रश्नांवरून आंदोलन, निषेध आणि आरोप-प्रत्यारोपाचे वारे पाहायला मिळत आहे. याच प्रश्नी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शुक्रवारी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृ्तवाखाली बिटको चौकातील रस्त्यावरील खड्ड्यात श्राद्ध घालत हे अनोखे आंदोलन करण्यात आले. नाशिक महापालिकने बहुतांश रस्ते विविध कामासाठी म्हणून खोदले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने कंत्राटदारांना दिले आहे. मात्र, त्यांनी खड्ड्यात फक्त माती आणि मुरूम टाकणे सुरू केले आहे. सध्या शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे बुजविलेल्या खड्ड्यातील माती आणि मुरूम याने चिखल होत आहे. त्यामुळे दुचाकीचालकांचे किरकोळ अपघात होत आहेत. याबद्दल महापालिकेला वारंवार निवेदन देऊन झाले. मात्र, महापालिकेतील कारभारी मूग गिळून गप्प आहेत, असे म्हणत खैरे यांनी शुक्रवारी जोरदार टीकास्त्र सोडले. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा होती.
सत्ताधारी भाजपला घरचा आहेर
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला वारंवार घरचा आहेरही मिळत आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी डेंग्यू आणि रस्त्यावरील खड्डे भरण्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले होते. रस्तेप्रश्नी आयुक्तांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती. विद्युत विभागावरून भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे आणि महिला व बालकल्याण योजना रखडल्यामुळे स्वाती भामरे आक्रमक झाल्या. त्यानंतर जगदीश पाटील यांनी टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. गुरुवारी भाजपचे महापालिकेतील सभागृह नेता कमलेश बोडखे यांनी रस्त्यांची चाळणी झाली आहे म्हणत घरचा आहेर दिला. शहरातील रस्ते मुरून टाकून बुजवले जात आहेत. यात कंत्राटदार चलाखी करत आहेत. या कामाची त्रयस्थांमार्फ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (NCP Youth Congress agitation in Nashik over repair of inferior roads)
इतर बातम्याः
नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना