सर्वात मोठी बातमी, नॉट रिचेबल शुभांगी पाटील आयुक्त कार्यालयात दाखल, म्हणाल्या…..

| Updated on: Jan 16, 2023 | 4:10 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या आता नुकत्याच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील कालपासून नॉट रिचेबल होत्या.

सर्वात मोठी बातमी, नॉट रिचेबल शुभांगी पाटील आयुक्त कार्यालयात दाखल, म्हणाल्या.....
Follow us on

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Padvidhar Election) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या आता नुकत्याच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील कालपासून नॉट रिचेबल होत्या. त्यामुळे शुभांगी पाटील नेमक्या गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित होता. शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) पाठिंबा मिळाला आहे. शुभांगी यांनी नुकतंच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी येथे जावून भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्या नॉट रिचेबल होत्या. अखेर अनेक तासांनी त्या आता समोर आल्या आहेत. शुभांगी पाटील या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला.

शुभांगी पाटील यांनी आज आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मला ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळालेला आहे. आता महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”, असं शुभांगी पाटील यांनी सांगितलं.

“मी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आता महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार आणि जयंत पाटील हे चारही पक्षश्रेष्ठी तुम्हाला याबाबत माहिती देतील. मी न सांगितलेलं बरं”, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

शुभांगी पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी?

शुभांगी पाटील यांना यावेळी उमेदवारी मागे घेण्यासाठी कुणाकडून दबाव टाकण्यात आला का, तसेच कुणी धमकी दिली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रत्यक्ष उत्तर न देता अप्रत्यक्षपणे हो असंच उत्तर दिलंय. “नॉट रिचेबलवरुन तुम्ही समजू शकता. मी न बोललेलं बरं. पण मी माघार घेतली नाही”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

“माझी जनता ऐकत आहे. जनतेने धनशक्ती की जनशक्ती हे जनता ठरवेल. मला नक्की विश्वास आहे की जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास केला असेल. दोन तारखेला धनशक्ती जिंकते की जनशक्ती जिंकते हे स्पष्ट होईल”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

“महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांनी एकमेव काम करणाऱ्या महिला नेत्यावर विश्वास ठेवला आहे. ते नक्कीच योग्य निर्णय घेतील. मी उद्धव ठाकरे यांच्याकडे जावून आली. त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिलेले आहेत. मी नाना पटोले, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय”, असं शुभांगी यांनी सांगितलं.

मी तीन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला उमेदवारी देणार असा शब्द दिला होता. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन महिन्यांसाठी कोणी जाणार नाही. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करु, असं सांगितलं होतं, अशी माहिती शुभांगी यांनी दिली.