जळगाव | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे एका मोठ्या संकटात सापडले आहेत. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी खडसे कुटुंबीयांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या नोटिशीमुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. सातोर शिवारात 1 लाख 18 हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती.
एसआयटीने या प्रकरणाची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांना ही 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या नोटिशीला एकनाथ खडसे अथवा रक्षा खडसे यांनी अद्याप दुजोरा दिला नाही. या प्रकरणी ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, कालच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार आहे. एसआयटीची चौकशी पूर्ण झाली आहे. कारवाईला सुरुवात होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. आरोप खरा असल्यामुळेच एसआयटी नियुक्त करण्यात येऊन चौकशी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर खडसे यांना नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याचे पुरावे सुद्धा आहेत. माझा आरोप खरा असल्यामुळे चौकशीसाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. आता एसआयटीची चौकशी पूर्ण झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. लवकरच कारवाईबाबतचे पत्र आपल्या हातात पडेल, अशी माहिती पाटील यांनी दिली होती.