शिवसेना आमदार सुहास कांदे संतापताच भर बैठकीत अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली, पाहा नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 14, 2023 | 7:33 PM

शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली. संबंधित घटेनचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.

शिवसेना आमदार सुहास कांदे संतापताच भर बैठकीत अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली, पाहा नेमकं काय घडलं?
Follow us on

नाशिक : शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज चांगलेच संतापले. नाशिक जिल्हा परिषदमध्ये ‘गुंडाराज’ असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने कांदे चांगलेच आक्रमक झाले. यावेळी ज्या अधिकाऱ्यावर कांदे संतापले त्यांना बैठकीतच अशक्तपणा आला. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यावर कांदे संतापले. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी ही बैठक आटोपती घेतली.

नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे पालकमंत्री दादा भुसे यांना माहिती देत होते. संबंधित विषय हा निधी वाटप संदर्भात होता. यावेळी अधिकारी अर्जुन गुंडे हे पालकमंत्र्यांना माहिती देत होते. पण ते बोलत असतानाच सुहास कांदे संतापले. मालेगाव तालुक्याला निधी द्यायचा नाही हे तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करत त्यांनी शासन निर्णय वाचून दाखवला. यावेळी ते चांगलेच संपातलेले होते.

“माझी उपाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की, कुठल्यातरी अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सुरळीत काम होणार नाही. मी नुसता बोलतो पण कारवाई होत नाही. मला असं वाटतं गुंडेंवरच कारवाई करा”, अशी मागणी सुहास कांदे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

पूर्ण जिल्हा परिषद गुंडेच चालवतात. वरुन मला धमकीचा मेसेज करतात. म्हणजे त्यांची धमकी देण्याची लायकी नाही. पण प्रेमाच्या पोटी ते धमकी देतात. असं करु नका, तसं करु नका, हे होईल, अशी मदत करतो, तशी मदत करतो आणि आमच्यात आपसात भांडणं लावतात”, असा आरोप सुहास कांदे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर केला.

“जिल्हा परिषद हे चालवतात का? यांच्या घरची जिल्हा परिषद आहे का? कुठल्याही खात्याचा विषय असल्यानंतर हे हस्तक्षेप करतात. यांचा काय संबंध आहे?”, असा सवाल सुहास कांदे यांनी केला.

“मला असं वाटतं की, त्यांनी बांधकाम 2 ही बघावं ना, हे सर्व जिल्हा परिषदच का बघतात? सीईओ मॅडमकडे काही काम असलं की हे फोन करतात, दुसऱ्या खात्याकडे काम असलं की हे फोन करतात, गुंडे यांच्यावरील कारवाईसाठी सर्व आमदारांनी एक व्हावं. कुठल्याही एक अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे”, असं कांदे म्हणाले.

“आम्ही केलेल्या तक्रारीची नोंद झाली पाहिजे. इथे काहीच कारवाई होत नाही. मी पालकमंत्र्यांना नम्र विनंती करतो, जिल्हा परिषदेला कुणालाही विचारा, पूर्ण जिल्हा परिषदेचे सर्व कंत्राटदार यांना भेटतात. आम्ही लोकांमधून निवडून येतो. त्यांना काय तोंड दाखवायचं? 48 गावं आहेत, असं सुहास कांदे संतापात म्हणाले.

सुहास कांदे एकीकडे आक्रमकपणे बोलत असताना अधिकारी गुंडे यांना चक्कर आले. ते जागेवरती बसले. त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्यांना लगेच पाणी देण्यात आलं.