उमेश पारीक, लासलगाव, नाशिक | 2 नोव्हेंबर 2023 : शेती हा व्यवसाय हातबट्याचा म्हटला जातो. कारण कधी ओला दुष्काळ असतो. तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे दोघांमधून एखादा हंगाम चांगला आला तर शेतमालास बाजारभाव मिळत नाही. आठवड्यापूर्वीच कांद्याचे दर चांगलेच वधारले होते. किरकोळ बाजारात कांदा ८० ते १०० रुपये किलोवर गेला होता. शेतकऱ्यांना कांद्यातून चांगला पैसा मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अचानक चक्र फिरु लागली. त्यानंतर कांद्याचे भाव गेल्या पाच दिवसांपासून कमी होऊ लागले. शेतकऱ्यांना पाच दिवसांत 36 कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यासाठी तीन कारणे कारणीभूत ठरली.
कांद्याचे दर घसण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणभूत ठरले. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढू लागताच केंद्र शासनाने दोन महत्वाचे निर्णय घेतले. पहिला निर्णय म्हणजे नाफेड, एनसीसीएफचा बफर स्टॉकमधील दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणला. हा कांदा पंचवीस रुपये दराने विकला जाणार आहे. दुसरा निर्णय म्हणजे कांद्याचे निर्यात शुल्क 800 डॉलर प्रति टन केले. या दोन निर्णयामुळे कांदा दरावर परिणाम झाला. कांद्याचे दर घसरले. त्यानंतर सोशल मीडियातील एका मेसेजमुळे आणखी परिणान झाला. आता कांद्याची दर 4 हजार 200 रुपयांपर्यंत खाली आले आहे.
लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळीनिमित्त 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे, असा मेसेज सोशल मीडियावर फिरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजारात आणला. बाजारसमितीत कांद्याची आवड वाढल्यामुळे दरात घसरण झाली. गेल्या पाच दिवसांत कांद्याच्या सरासरी दरात 725 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
दिवाळी आता आठवड्याभरावर आली आहे. दिवाळीला शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची अपेक्षा होती. त्यामुळेही शेतकऱ्यांनी चांगला दर दिसताच कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला. परंतु कांद्याचे दर कमी झाले. यामुळे कमी दरात कांद्याची विक्री करुन शेतकऱ्यांना जावे लागले.