नाशिकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याची भयानक घटना, स्फोटामुळे परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या

| Updated on: Dec 09, 2023 | 8:05 PM

नाशिकमध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, परिसरातील इमारत आणि वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर नेमकं काय घडलं? याबाबत सुरुवातीला रहिवाशांना समजत नव्हतं. त्यामुळे काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

नाशिकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याची भयानक घटना, स्फोटामुळे परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या
Follow us on

चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक | 9 डिसेंबर 2023 : नाशिकमध्ये आज मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात असणाऱ्या वाहनात आज मोठी दुर्घटना घडली. संबंधित वाहनात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या स्फोटाचा आवाज कानठळ्या बसतील इतका मोठा होता. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील इमारतींच्या अक्षरश: काचा फुटल्या. ऑक्सिजनचा गॅस सिलेंडर फुटल्यानंतर इतका मोठा विध्वंस होणारी ही पहिली घटना असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये आहे. घटनेनंतर परिसरात काय घडलं हे पाहण्यासाठी पाहणाऱ्यांची गर्दी जमली. घटनेनंतर झाडांच्या फांद्या देखील तुटल्या होत्या. ही घटना नेमकी कशी घडली? याबाबतचा तपास सध्या प्रशासनाकडून सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील पंपिंग स्टेशन येथे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनातील सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन वाहून नेणारे वाहन डिवायडरला आदळल्याने दोन टाक्यांचा ब्लास्ट झाल्याने परिसरात जोरदार आवाज झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

स्फोटाचा मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की परिसरातील इमारतीच्या काचा देखील फुटल्या. त्यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ उडाली.

या घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच पोलीस प्रशासनदेखील दाखल झालं. अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष जाधव यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “स्पीड ब्रेकरवर गाडी आदळल्याने हा स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. परिसरात काही वाहनांच्या आणि इमारतीच्या देखील काचा फुटल्या आहेत”, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली.