नाशिकः गणेशोत्सव (GaneshFestival) आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन (food drug administration) जागे झाले आहे. मिठाईमध्ये भेसळ केली तर दहा लाखांपर्यंत दंड आणि पाच वर्षांचा कारावास होऊ शकतो, असा इशारा त्यांनी शहरातील व्यावसायिकांना दिला आहे. (Penalty of Rs 10 lakh for adulteration of sweets, imprisonment for five years)
गणेशोत्सवापासून सणांची धूम सुरू होते. दहा दिवसांच्या या उत्साहातच महालक्ष्मीचा सण येतो. त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि पाठोपाठ दिवाळीचे आगमन होते. सण म्हटले की, मिठाई आलीच. गणेशोत्सवात मोदकाचे नाना प्रकार बाजारात विकायला आले आहेत. मात्र, अनेकदा या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकार घडतात. त्याचा वाईट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होतो. हे पाहता अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांची एक बैठक घेत त्यांना मिठाईमध्ये भेसळ करू नये अशी कडक तंबी दिली. मिठाईच्या प्रत्येक पॅकवर उत्पादन दिनांक, एक्सपायरी डेट ठळकपणे छापावी. स्वच्छतेबाबत गंभीर रहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. जे व्यावसायिक मिठाईमध्ये किंवा अन्न पदार्थांमध्ये भेसळ करतील किंवा शासनाच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सोबतच पाच वर्षांचा कारावासही भोगावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
मोदकाचे विविध प्रकार
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोदकाचे विविध पदार्थ विक्रीस आले आहेत. त्यात मावा मोदक, बर्फी मोदक, पेढा मोदक यांचा समावेश आहे. महालक्ष्मीच्या सणादरम्यान गोड पदार्थांचे अजून वेगवेगळे प्रकार येतील. या काळात मिठाईला जास्त मागणी असते. त्यामुळे व्यावसायिकांनी आतापासून मिठाई निर्मितीची तयारी जोरात सुरू केली आहे.
पूजा साहित्याची दुकाने सजली
नाशकात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. गणपतीचे हार, सजावट, मखरांचे नाना प्रकार उपलब्ध झाले आहेत. बाप्पांचे डेकोरशन करण्यासाठी विविध प्रकारच्या लायटिंग बाजारात आल्या आहेत. त्यात चिनी कंपनीचे दिवे अगदी स्वस्तात उपलब्ध होत आहेत. पन्नास रुपयांपासून या माळा मिळत असून, जास्तीत जास्त पाचशे, हजारापर्यंत आहेत.
सध्या सणाचे दिवस आहेत. या काळात नागरिक गोडधोड पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सणच काय इतर कुठल्याही काळात व्यापाऱ्यांनी मिठाई आणि अन्न पदार्थांमध्ये भेसळ करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– चंद्रशेखर साळुंखे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (Penalty of Rs 10 lakh for adulteration of sweets, imprisonment for five years)
इतर बातम्याः
काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी