शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा नरेंद्र मोदींनी दिंडोरीत सांगितला अर्थ, काँग्रेस आणि छोट्या पक्षांबद्दल नेमकं भाकीत काय?

| Updated on: May 15, 2024 | 4:54 PM

"इथल्या नेत्याने सर्व छोटे छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणुका संपल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपले आपले शटर बंद केले पाहिजे. त्यांना वाटतं सर्व दुकान त्या दुकानात गेले तर काँग्रेस विरोधी पक्ष बनेल. ही यांची परिस्थिती आहे", अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

शरद पवारांच्या त्या विधानाचा नरेंद्र मोदींनी दिंडोरीत सांगितला अर्थ, काँग्रेस आणि छोट्या पक्षांबद्दल नेमकं भाकीत काय?
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिंडोरीत सभा पार पडली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्ष हे काँग्रेस पक्षासोबत जाण्याबाबत किंवा काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं मोठं वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांच्या याच वक्तव्याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि ठाकरे गटावर नाव न घेता निशाणा साधला.

“एनडीए आघाडीला मोठा विजय मिळणार आहे, याची माहिती इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याच्या विधानातून कळतं. त्यांना माहीत आहे की, इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस प्रचंड प्रमाणात हारणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही. त्यामुळेच इथल्या नेत्याने सर्व छोटे छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणुका संपल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपले आपले शटर बंद केले पाहिजे. त्यांना वाटतं सर्व दुकान त्या दुकानात गेले तर काँग्रेस विरोधी पक्ष बनेल. ही यांची परिस्थिती आहे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

मोदींकडून पुन्हा नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी म्हणून घणाघात

“ही नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचं काँग्रेसमध्ये विलय होणार आहे. जेव्हा या नकली शिवसेनेत विलय होईल. तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येणार. कारण बाळासाहेब म्हणायचे, शिवसेना काँग्रेस बनल्याचं कळलं तेव्हा शिवसेना बंद करेल. म्हणजे नकली शिवसेनेचा आतापत्ताही राहणार नाही. मला वाटतंय हा विनाश होत आहे, त्याने बाळासाहेब दुखी होत असतील. नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं आहे”, अशा खोचक शब्दांत नरेंद्र मोदी यांनी टीका केली.

“बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर उभं राहावं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जम्मू काश्मीरमधून आर्टिकल ३७३ रद्द व्हावं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण याची चीड नकली शिवसेनेला येत आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला ठोकर मारली. नकली शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला. काँग्रेसचे लोक मंदिरावरून अनापशनाप बोलत आहे. नकली शिवसेना चूप आहे. यांची पार्टनरशीप ही पापाची पार्टनरशीप आहे. महाराष्ट्रासमोर यांचं पाप एक्सपोज झालं आहे”, अशी टीका मोदींनी केली.

“नकली शिवसेनेवाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन नाचत आहे. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला डोक्यावर घेतलं जात आहे. राज्यातील स्वाभिमानी जनता हे पाहत आहे. राज्यातील लोकांचा राग वाढला आहे. पण नकली शिवसेनेत एवढा अहंकार आलाय की त्यांना लोकांच्या भावनेशी काही घेणंदेणं नाही. काँग्रेसच्या पुढे गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं महाराष्ट्राने ठरवलं आहे. चार टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत. या टप्प्यात जनतेने त्यांना चित केलं आहे”, असा घणाघात मोदींनी केला.