निसर्गाने नटलेल्या इगतपुरीत नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी, पोलिसांचा कडक इशारा

| Updated on: Dec 16, 2024 | 3:51 PM

इगतपुरीत नवीन वर्षाच्या उत्सवात होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत. रेव्ह पार्ट्या, हुक्का आणि मादक पदार्थांच्या सेवनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि इतर आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि ध्वनी प्रदूषण टाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम तोडल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

निसर्गाने नटलेल्या इगतपुरीत नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी, पोलिसांचा कडक इशारा
Follow us on

इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून इगतपुरीत अनेक ठिकाणी अनेकांनी रेव्ह पार्ट्या, हुक्का, अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आल्याने इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यापुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या अखेरच्या रात्री आणि नविन वर्षाच्या स्वागत प्रसंगी आपले हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, रो हाऊसेस, धाबे, रेस्टॉरंट यात कुठल्याही अंमली पदार्थांचे पार्टीचे आयोजन करू नये, असा कडक इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांनी दिला आहे.

“आपल्या हॉटेल, लाँज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, धाबे यांच्याकडे असलेल्या रजिस्टरमधील सर्व नोंदी अद्ययावत ठेवून वेळोवेळी पोलीस ठाण्यास माहीती देऊन ग्राहकांशी चांगली वागणूक द्यावी. आपल्या हॉटेल, लाँज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, धाबे येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. तसेच ते चालू स्थितीत ठेवावे. आपले हॉटेल, धाबे, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि आस्थापना हे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू आणि बंद करावे. हॉटेल, लाँज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, रो हाऊसेस, धाबे, रेस्टॉरंट यात विनापरवाना कुठल्याही प्रकारच्या हुक्का, मादक पदार्थ, दारुचे विक्री करू नये. अथवा दारू, बिअर वा तत्सम पदार्थांची पिण्यास पार्टीस परवानगी देवू नये”, अशा सूचना पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांनी दिल्या आहेत.

‘…तर गुन्हा दाखल करण्यात येईल’, पोलिसांचा मोठा इशारा

“हॉटेल, लाँज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, रो हाऊसेस, धाबे, रेस्टॉरंट यात शासनाने ठरवून दिलेल्या परवानगीनुसार, वेळेनुसार आणि क्षमतेनुसार लाउडस्पिकरचा वापर करावा. ध्वनी प्रदुषण होणार नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. कुठल्याही प्रकारच्या डीजे आणि साउंड सिस्टमचा वापर करून ध्वनी प्रदूषण करता कामा नये. नियमाचे पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल”, असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी हरीष खेडकर यांनी दिला.