Video : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या, पहिल्यांदाच असं घडलं: गौतमी हिच्या क्रेझला ब्रेक?

| Updated on: May 17, 2023 | 7:45 AM

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नाशिक येथील कार्यक्रमाला पब्लिकने पाठ फिरवली. तिच्या कार्यक्रमात काल गर्दी नव्हती. पब्लिकपेक्षा रिकाम्या खुर्च्याच अधिक दिसत होत्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Video : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या, पहिल्यांदाच असं घडलं: गौतमी हिच्या क्रेझला ब्रेक?
gautami patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : दिलखेच अदा, जोशपूर्ण परफॉर्मन्स आणि तडकती भडकती गाणी याच्या जोरावर धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या क्रेझला उतरती कळा लागली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गौतमी आणि गर्दी हे समीकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. गौतमीच्या कार्यक्रमात नुसती गर्दी होत नाही तर गर्दीचा धुमाकूळ असतो. पब्लिक अक्षरश: राडा घालते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात पब्लिकला पोलिसांचा प्रसाद बसतोच बसतो. पण नाशिकमध्ये चित्र काही वेगळं दिसलं. कार्यक्रम सुरू झाला तरी गौतमीच्या कार्यक्रमातील खुर्च्या रिकाम्या होत्या. पब्लिक कार्यक्रमाकडे फिरकलीच नाही. पहिल्यांदाच असं घडल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. नेमकं काय घडलं नाशिकमध्ये?

YouTube video player

नाशिकच्या ठक्कर डोम येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल लावणीचा कार्यक्रम पार पडला. नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी असते. मात्र नाशिकमध्ये प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली आहे. कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त असल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला 300 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंतचे तिकीट लावण्यात आले होते. एवढे महागडे तिकीट परवडत नसल्याने तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पब्लिक फिरकलीच नाही. त्यामुळे अल्प गर्दी आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच गौतमीला कालचा कार्यक्रम उरकावा लागला.

हे सुद्धा वाचा

तरीही हुल्लडबाजी

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दी नव्हती. बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. पण काही प्रमाणात प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. आलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रम सुरू होताच हुल्लडबाजी सुरू केली. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की आयोजकांना वारंवार कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा द्यावा लागला. पण तरीही हुल्लडबाज काही ऐकायला तयार नव्हते. अखेर गौतमीच्या सुरक्षारक्षकांना या हुल्लडबाजांना चोप द्यावा लागला.

मी वेळेत पोहोचले

दरम्यान, गौतमी पाटील हिच्यावर सोलापूरच्या बार्शी येथे फसवणुकीच्या गुन्हा दाखल झाला आहे. गौतमी पाटीलने या प्रकरणी तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले. आपण वेळेतच कार्यक्रमाला पोहोचलो होतो. पण जे काही आरोप करण्यात आले आहेत, तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्याची सखोल माहिती घेऊन यावर पुढील भाष्य करू, असं गौतमी पाटीलने स्पष्ट केले. अजून आपलं लग्न ठरलेलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचे देखील गौतमीने स्पष्ट केले आहे.