नाशिक : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचा ठाकरे गट एकत्र आल्याची चर्चा असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीत आपण ठाकरे गटासोबत लढू असं जाहीर केलेलं होतं. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित विधान केलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात होतं. पण राजकारणात कधी काय होईल, याचा काही भरोसा नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं कारण देत उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे विरोध करतात ही वस्तुस्थिती आहे. आता हा युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरेंनी ठरवावं, त्यांना कुणाबरोबर युती करायची आहे ते? नाहीतर आम्ही आमचा मार्ग लढू”, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
आधी उद्धव ठाकरेंसोबत एकाच मंचावर, नंतर एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणत्या घडामोडी घडतील याचा अंदाज लावणं फार कठीण आहे. प्रकाश आंबेडक एकेकाळी शिवसेनेवर टीका करायचे. पण शिंदे गट विभक्त झाल्याने आता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची शक्यता होती.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली होती. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी चर्चा करण्यासाठी झाल्याची माहिती समोर आली होती. पण या बैठकीवरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण प्रकाश आंबेडकर यांनी सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं होतं.
अजित पवार यांची प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. अजित पवार प्रकाश आंबेडकर यांना आपल्या पक्षासोबत युती करण्यास इच्छूक असल्याचं तेव्हा स्पष्टपणे दिसून आलं होतं. पण आता प्रकाश आंबेडकर यांनी वेगळं विधान केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.