नाशिक: नाशिकच्या साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली आहे. संभाजी ब्रिगेडच्या या शाई फेकीचं भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. ही संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल, असं दरेकर म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपाहार्य लिहिलं गेलं असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहित असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मला वाटतं काही लोक कारण नसताना वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. छत्रपती संभाजी महाराज असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असोत. ही सर्व आमची दैवतं आहेत. त्यांच्याविषयी कारण नसताना अकलेची तारे तोडले जातात. काही लोकांना वाटतं मोठ्या पुरुषांवर वक्तव्य केली तर वाद तयार होईल आणि आपण चर्चेत राहू. चर्चेत राहिल्यावर आपल्याला वेगळी ओळख मिळेल, असं काही लोकांना वाटतं. त्यामुळे हे लोक बरळत असतात, असंही ते म्हणाले.
एखाद्या अज्ञानी आणि समज नसलेल्या माणसाने एखादी गोष्ट केली तर समजू शकतो. पण जी लोकं स्वत:ला विद्वान समजतात. ज्यांच्या लेखणीतून संस्कार द्यायचे असतात. त्यांनीच जर वातावरण कलुषित करणाऱ्या गोष्टी केल्या असतील तर त्या चुकीच्या आहेत. त्यांनी अशा गोष्टी करताना विचार करून लिहिलं पाहिजे. संपादकीय वगैरे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी असतात. त्याचा समाजावर परिणाम होतो. त्यामुळे या पदावरील लोकांनी भान ठेवलं पाहिजे. कारण बातमी आणि अग्रलेखाने समाजवर परिणाम होत असतो, असं त्यांनी सांगितलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 5 December 2021 pic.twitter.com/mNZ6o6uFia
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 5, 2021
संबंधित बातम्या:
Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार
साहित्य संमेलनाला आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, साहित्य नगरीत खळबळ; दोघांना माघारी पाठवले