नाशिकः प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे असल्याचे कोल्हापूर पोटनिवडणुकीतील (Kolhapur By Election) निकालाने दाखवून दिले आहे, असे फटाके शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये (Nashik) निवडणूक निकालाची घोषणा होण्यापूर्वीच फोडले. राऊतांनी शनिवाटी पंचवटी येथील सप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आरती केली. यावेळी शिवसैनिकांनी जय श्रीरामची जोरदार घोषणाबाजी केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता या ठिकाणची मतमोजणी सुरू झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी जोरदार आघाडी घेतली. ही बढत तोडणे आता सत्यजित कदमांना जवळपास अशक्य आहे. त्यामुळे निकाल घोषित व्हायच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयी फटाके फोडायला सुरुवात केलीय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी काळारामाची आरती केली. मंदिराच्या नोंदवहीत आपण बटुकेश्वर मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची नोंद केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रभू रामाचे धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीने या दैवतांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले आहे. विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समाचार घेतला.
मुंबई महापालिकेची निवडणूक ध्यानात घेता भाजप विरुद्ध शिवसेनेने आतापासूनच राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिलीय. नाशिकमध्येही आगामी काळात महापालिका निवडणूक होतेय. येथेही मुख्य लढत भाजप विरुद्ध शिवसेना अशीच होणाराय. भाजपकडून गिरीश महाजन या निवडणुकीचे नेतृत्व करणार आहेत. तर शिवसेनेकडून स्वतः संजय राऊत ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तयारी करतायत. मनसेनेही या ठिकाणी जोर लावलाय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघताना दिसते आहे.