चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 20 ऑक्टोबर 2023 : इथल्या राजकारण्यांना खासकरून काही मंत्री आणि आमदारांना हप्ता किती मिळतो याची माहिती मला काल पोलिसांच्या सूत्रांनी सांगितली. त्यांनी मला कागद पाठवला. मला धक्का बसला. ललित पाटील याचे मित्रपरिवार आणि सहकारी विधानसभेपर्यंत आहेत. काल दोन महिलांना अटक झाली. ललित पाटीलच्या मैत्रीणी विधासनसभेपर्यंत आहेत. त्यांना इथून हप्ता जात होता. त्या हप्त्याचे आकडे महिन्याला 10 ते 15 लाखाच्यावर आहेत, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राऊत यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये ड्रग्स विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. त्यापूर्वीच त्यांनी मीडियाशी संवाद साधून धक्कादायक आरोप केला आहे. राज्यातील नशेच्या बाजाराचं मुख्य केंद्र नाशिक होत आहे. आम्ही नाशिकला तीर्थक्षेत्र मानतो. सांस्कृतिक क्षेत्र मानतो. त्या नाशिकमध्ये गल्लीगल्लीत, पानटपरीवर, शाळांच्या आसपास, घरापर्यंत ड्रग्स पोहोचला असेल तर त्याविरोधात आवाज उठवावा लागेल. रस्त्यावर उतरावं लागेल. त्यासाठी मोर्चा आहे. या मोर्चाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या नशेच्या बाजारावर कुणी तरी आवाज उठवायला हवा होता. यावरून अनेक आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. चिखलफेक सुरू आहे. अनेक आमदार आणि मंत्र्यांची नावे त्यात आली आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय एवढा मोठा नशेचा व्यापार चालू शकत नाही. काल रात्री मला एका महत्त्वाच्या सूत्राने कागद दिला. तो कागद वाचून मला धक्का बसला. काल जे एकदोन लोकं पकडले त्याविषयी बोलणार नाही. ते मोहरे आहेत. हा व्यापार मालेगावपर्यंत आहे. एक दोन जणांच्या हातात सूत्रे नाहीत. हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, असा दावा राऊत यांनी केला.
माणगावपर्यंत या धंद्याचे धागेदोरे आहेत. ज्या ड्रग्स रॅकेटमध्ये सत्तेतील आमदार आहेत. मंत्र्यांवर आरोप झालेत. पोलिसांवर आरोप आहेत. ड्रग्सविरोधात शिवसेनेने मोर्चाची घोषणा करताच कारवाईला सुरुवात झाली. शिवसेनेने प्रश्न हाती घेतल्यावर हॉटेलवर धाडी, शाळा, महाविद्यालयाच्या आसपासच्या पानटपऱ्यांवर छापे आदी प्रकार सुरू झाले. पण कालपर्यंत या अड्ड्यांवरून त्यांना हप्ते मिळत होते. हे जगजाहीर झाले आहे, असं ते म्हणाले.
ज्यांना अटक केली. त्याबाबत पोलिस निर्णय घेतील. पण नाशिक आणि मालेगावपर्यंतचा व्यापार एकदोन जणांच्या नियंत्रणात नसून त्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत गेले आहेत. इंदूरपर्यंत आहेत. गुजरातमध्ये ड्रग्स सापडले, त्याचे धागेदोरे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपर्यंत गेले आहेत, असंही ते म्हणाले.