चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 20 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर ड्रग्स प्रकरणावरून जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. ही टीका सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स प्रकरणात आमदारांना किती हप्ता मिळायचा याची माहितीच संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या विधानावर राजकीय पडसादही उमटू लागले आहेत.
ठाकरे गटाने ड्रग्स विरोधात नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी संजय राऊत आज नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. काल मला पोलीस सूत्रांनी एक कागद दिला. त्यात ड्रग्स प्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचे आकडे होते. ते पाहून मला धक्काच बसला. एका आमदाराला 16 लाखांचा हप्ता मिळतो. असे सहा आमदार आहेत. हे रॅकेट मोठं आहे. साधं सोपं नाही. फडणवीस यानी शाहजोगपणा करू नये. प्रतिष्ठा सांभाळावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं संजय राऊत म्हणाले.
ड्रग्स प्रकरणातील नेक्सस उघड होईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नेक्सस उघड झालं आहे. फडणवीस यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते भरकटल्यासारखे बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. त्यांच्या आसपास जी माणसं आहेत ना या नशेच्या बाजारात फिरत आहेत. त्या नशेबाजांमुळे फडणवीस यांची मती गुंग झाली आहे. कसले नेक्सस उघड होईल? तुम्ही गृहमंत्री आहात. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि तुम्ही राजकारण करताय? असा सवाल राऊत यांनी केला.
तुमच्या नागपूरमध्ये तुमच्याच कार्यकर्त्यांनी डीसीपीची कॉलर पकडलीय. काय करता तुम्ही? काय गृहमंत्री या महाराष्ट्राला लाभले. दुर्देव आहे महाराष्ट्राचं. बाळासाहेब देसाई सारखा गृहमंत्री या राज्यात होऊन गेला. अनेक चांगले गृहमंत्री पाहिले. पण कुणीही सूडाने कारवाई केली नाही. तुमच्या आजूबाजूला माफिया बसला. त्याची बाजू घेता. धन्य आहात तुम्ही, असं सांगतानाच गृहमंत्र्यांकडे सर्वांची माहिती असते, विरोधकांची माहिती असते. फक्त ड्रग्स माफियांची माहिती नाही. काय उखडायचे ते उखडा? काय करणार आहात तुम्ही? कुणाची बाजू घेत आहात? ड्रग्स गुजरातमधून येतंय त्यांची बाजू घेताय? असा सवाल त्यांनी केला. फडणवीस यांना फ्रस्टेशन आहे. त्यांची वेदना समजू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव माहीत आहे. त्यांच्या मनातील वेदना माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्ही मोर्चासाठी सर्वांना आवाहन केलं होतं. शिक्षक आणि पालकांनी मोर्चात सामील व्हावं असं आमचं आवाहन आहे. शैक्षणिक संस्था आणि चालकांनी आमचं अभिनंदन केलं आहे. त्यांचे विद्यार्थी मोर्चात येणार आहेत. हा सामाजिक प्रश्न आहे. पण काल एका शिक्षण अधिकाऱ्याने पत्रक काढलं आणि विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये असे आदेश दिले. म्हणजे विद्यार्थ्यांनी नशेच्या आहारी जावे का? पानटपऱ्यांवर ड्रग्स मिळते त्याला त्यांचं समर्थन आहे का? हे असले अधिकारी? काय चाललंय? असा सवाल त्यांनी केला.
कलेक्टरकडे बैठक घेण्यात आल्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बैठक झाली. का तर विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी करून घेऊ नका म्हणून. तुमचा संबंध काय? तुमचा राजकारणाशी संबंध काय? तुम्ही एका खुर्चीवर आहात त्याला राजकारणाचं वारं लागू नये. ते तुमचं काम नाही. पण त्या बाईंनी नाशिकला येऊन कलेक्टरकडे बैठक घेतली. मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, असे आदेश दिले. तुम्ही राजकारणात का पडता? असा सवालच त्यांनी केला.