चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. आमच्यावर झालेले आरोप खरे आणि तुमच्यावर झालेले आरोप खोटे काय? तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल असे पुरावे आमच्याकडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. नाही तर महाराष्ट्रात स्फोट होतील, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी कालही हाच इशारा दिला होता. आजही तोच इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. बुकींबरोबरच्या फोटोवरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार हल्लाबोल सुरू आहे. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. फोटोचं राजकारण काढलं तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयांचे कुणाकुणाबरोबर फोटो आहेत. तेही बाहेर येतील. आमच्यावर संस्कार आहेत. कुणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाही. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबातील कुणी तुरुंगात जाईल असं दळभद्री राजकारण आम्ही केलं नाही. पण ही कटुता फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणली. केंद्रात मोदी आणि शाह यांनी आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आजही एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगात आहेत. त्याचं उत्तर महाजन, फडणवीस यांनी दिलं पाहिजे. आम्ही तुरुंगात गेलो. देशमुख तुरुंगात गेले. मलिक तुरुंगात आहेत. काय कारणं काय आहेत? आमच्यावर आरोप होतात ते खरे. तुमच्यावरील आरोप खोटे का? तुमचेही कुटुंब तुरुंगात जातील असे पुरावे आमच्याकडे आहेत. पण तुमच्या कुटुंबापर्यंत जाणार नाही. आम्हाला तोंड उघडालाय लावू नका महाराष्ट्रात स्फोट होतील, असा इशाराच राऊत यांनी दिला.
कोकणातील खेड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. ज्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. तिथेच शिंदे यांची सभा होत आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर राऊत यांनी शिंदे यांच्यावर प्रचंड टीका केली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत? महाराष्ट्र त्यांना मुख्यमंत्री मानत नाहीत. पण एकनाथ शिंदे हे तरी स्वत: ला मुख्यमंत्री मानतात का? शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते बघायला फिरा. सभा कसल्या घेता? सभा घेऊन काय मिळणार आहे? आम्ही तुम्हाला नेस्तानाबूत करू. जोपर्यंत खुर्चीत आहात तोपर्यंत शेतकऱ्यांचं काम करा, असं ते म्हणाले.