नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Nashik Padvishar Election) पार्श्वभूमीवर अतिशय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर पक्षाच्या हायकमांडने कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आल्यानंतर एक पोस्टर समोर आलंय. संबंधित पोस्टर हे सत्यजित तांबे यांच्याशी संबंधित आहेत. या पोस्टरमध्ये सत्यजित तांबे यांची बाजू मांडण्यात आलीय. “जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे, माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल”, असं संबंधित पोस्टरमध्ये लिहिलं आहे. सत्यजित तांबे यांचं हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. नाशिकमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षाकडून कारवाई करण्यात आलीय. त्यांना काँग्रेस हायकमांडने निलंबित केलं आहे.
सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुधीर यांनी आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजितला पाठिंबा दिला होता. पण ही भाजपची राजकीय खेळ असल्याचा आरोप करण्यात येतोय.
सत्यजित तांबेंवर काँग्रेस पक्षाकडून कारवाईची टांगती तलवार
विशेष म्हणजे सत्यजित तांबे यांनी पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडने दिल्याची माहिती समोर आलीय. अशा परिस्थितीत आता सत्यजित तांबे यांचं एक पोस्टर समोर आलंय.
सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार?
भाजप नेते गिरीश महाजन सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहे. सत्यजित तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. असं असताना सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार तर नाहीत ना? अशा चर्चांना उधाण आलंय.
नाशिकमध्ये दुहेरी लढत
दरम्यान, नाशिकच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात दुहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला
दरम्यान, नाशिकमधून धनराज विसपूते तसेच धनंजय जाधव या उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात दुहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.