नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik MLC Election Result) अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचा विजय जाहीर झालाय. सत्यजीत तांबे आज सकाळपासून आघाडीवर होते. अखेर मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झालाय. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झालाय.
विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीभोवती गेल्या काही दिवसांपासूनचं राजकारण फिरत होतं. सत्यजीत यांच्या वडिलांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली असताना त्यांनी अर्ज दाखल केला नाही. याउलट सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीला वडील सुधीर तांबे यांनी पाठिंबा दिला होता.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपच्या गोटात कमालीची शांतता होती. भाजपकडून नाशिकच्या जागेसाठी उमेदवारही जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे ही भाजपची खेळी असल्याचं मानलं जात होतं.
भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. पण भाजपकडून त्यांना अधिकृत पाठिंबा देण्यात आला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही भाजपचीच राजकीय खेळी असल्याचा अंदाज बांधला जात होता.
याबाबतच्या उलटसुलट चर्चांना उधाण आल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत पक्षातून निलंबित केलं. पण तांबे पिता-पुत्रांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही भाजपची खेळी असल्याच्या चर्चा शिगेला पोहोचल्यानंतर ठाकरे गटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या.
शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीत सूत्र हलले. ठाकरे गटाने नाशिकच्या जागेसाठी हट्ट धरला. ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर शुभांगी या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील यासाठी प्रयत्न करण्यात आले.
शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शुभांगी यांना पाठिंबा देण्यास होकार दिला. त्यामुळे शुभांगी या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर झालं.
या दरम्यान सत्यजीत तांबे यांचा जोरात प्रचार सुरु होता. त्यांना शिक्षक भारतीनेसुद्धा पाठिंबा दिला होता. तसेच वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
दुसरीकडे शुभांगी पाटील यांनी आपण जिंकणार असा दावा केला होता. अखेर या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा विजय झालाय. दरम्यान, सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानस पगार यांचं अपघाती निधन झालंय. त्यामुळे त्यांनी विजयानंतर जल्लोष न करण्याचा निर्णय घेतलाय.