महत्त्व कशाला? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्येला?, श्रद्धा कशात असावी?; शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फटकारलं

| Updated on: Apr 09, 2023 | 9:40 AM

राज्याचं अख्ख मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्यावर गेलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. राज्यासमोरचे मुख्य प्रश्न काय आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

महत्त्व कशाला? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्येला?, श्रद्धा कशात असावी?; शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फटकारलं
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्याला गेले आहेत. अख्ख मंत्रिमंडळच अयोध्येत गेलं आहे. अयोध्येत गेल्यानंतर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर या अयोध्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे. महत्त्व कशाला द्यायचं? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्येला? त्यांची श्रद्धा अयोध्येत असेल तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांमध्ये आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते.

महागाई , कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला केलाच पाहिजे. आज धर्म जातीच्या नावाने माणसामाणसात अंतर निर्माण केलं जात आहे. आज महाराष्ट्रात अतिवृष्टीने नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचं नुकसान झालं. कांद्याचं नुकसान झालं. आता या सर्व प्रश्नांना महत्त्व आहे की आम्ही उठून अयोध्येला जायचं? यात प्राधान्य कशाला द्यायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, असा टोला शरद पवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

प्रत्येकाचं धोरण वेगळं असू शकतं

महत्त्वाचे प्रश्न काय? अयोध्येची यात्रा का? सर्व मंत्रिमंडळ आणि खासदार अयोध्येला जाऊन बसणं आणि त्या कामाला प्राधान्य देणं याचा अर्थ मूळ प्रश्नाला बगल देणं आहे. आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे असं ते म्हणाले. त्यांची श्रद्धा तिथे आहे. त्यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यात आहे. त्यांचं जे नुकसान होतंय त्याच्याशी निगडीत आहे. त्याच्या डोळ्यातील पानी कसं पुसता येईल आणि त्याला संकटातून कसं बाहेर काढता येईल यात आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचं धोरण वेगळं असू शकतं, असा चिमटाही पवारांनी काढला.

मी त्यात पडणार नाही

राजकारणाचा स्तर खालावला आहे. प्रत्येकजण एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करत आहे. त्यामुळे तुम्ही यात मध्यस्थी करणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर पवारांनी थेट भूमिका मांडली. मी काही त्यात पडणार नाही. प्रत्येकाला समजलं पाहिजे. बोलताना कसं बोलावं. कोणत्या प्रश्नासाठी आग्रह धरावा. हा लोकशाहीतील प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना शिवीगाळीचाच रस्ता योग्य वाटत असेल तर तो त्यांना अधिकार आहे, असंही ते म्हणाले.

हा प्रश्न महत्त्वाचा आहे का?

हिंदुत्वचा मुद्दा भाजपकडून रेटला जातोय. त्यावरही पवारांनी मत व्यक्त केलं. राज्य आणि देशासमोरचे मुख्य प्रश्न सोडवण्याची दृष्टी ज्या नेतृत्वात नाही ते लोक असे काही विषय काढून लक्ष डायव्हर्ट करतात. आज तो प्रश्न महत्त्वाचा आहे का? आज अतिवृष्टी, गारांचा पाऊस, शेतीचं नुकसान, कांद्याचं नुकसान, द्राक्षांचं नुकसान… लोकांच्या या सर्व अस्वस्थ करणाऱ्या चिंता आहेत. त्याचं काही पडलं नाही, अशी टीका त्यांनी केली.