नाशिक | 2 ऑक्टोबर 2023 : डीजेच्या आवाजामुळे मृत्यू ओढवल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे- लेझर लाइटमुळे सहा जणांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे. हे सहाही तरुण नाशिकचे आहेत. धुळे, मुंबई आणि ठाण्यातही असेच रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डीजे आणि लेझर लाइटच्यामुळे डोळ्यांवरच थेट परिणाम होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लावण्यास मनाई आहे. मात्र, आआठ वर्षानंतर नाशिकमध्ये डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या मिरवणुकीत तरुणांनी देहभान विसरून नाचले. लेझर लाईटचाही या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. सहा तरुण या डीजे-लेझर लाइटच्या थेट संपर्कात आले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर भयंकर परिणाम झाला आहे.
लेझर लाइटचा डोळ्यावर परिणाम झाल्यानंतर आधी या मुलांना अंधूक अंधूक दिसू लागलं. त्यानंतर त्यांचे डोळे चुरचुरू लागले. डोळे चोळल्यामुळे त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे हे तरुण घाबरले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञांनी त्यांना तपासले असता या तरुणांच्या डोळ्यात इजा झाल्याचं दिसून आलं. काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाले. काहींच्या नेत्रपटलावर रक्त साकळल्याचं आढळून आलं. तर काही तरुणांच्या डोळ्यांवर भाजल्यासारख्या जखमा आढळून आल्याचं सूत्रांनीसांगितलं. या सहाही तरुणांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. हे सर्व तरुण विशी-पंचवीशीतील असल्याचंही सांगण्यात आलं.
वेल्डिंगचं काम पाहिल्यानंतर साधारणपणे डोळ्यांवर जखमा किंवा भाजल्यासारखं दिसतं. पण या तरुणांनी वेल्डिंगचं काम पाहिलेलं नव्हतं. या तरुमांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचल्याचं सांगितलं. या मिरवणुकांमध्ये डीजे आणि लेझर लाइटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता, असंही त्यांनी सांगितलं. तर या मुलांना दृष्टीदोष निर्माण होऊन त्यांना कायम स्वरुपी डोळा गमवावा लागू शकतो, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे या मुलांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, गणपती विसर्जनावेळी भरत चव्हाण या 28 वर्षीय तरुणाला त्याचा डोळा गमवावा लागला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावातील हा तरुण आहे. गणपती विसर्जनावेळी फटाके फोडताना त्याच्या डोळ्यावर ठिणग्या उडाल्या. त्यामुळे त्याचा उजवा डोळा निकामी झाला आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यांना मोठ्या जखमा झाल्या आहेत.