मालेगाव : त्रिपुरा राज्यात आयोजित एका रॅलीमध्ये पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुस्लिम समाज आक्रमक झाला असून रॅली मार्फत याचा निषेध नोंदवण्यात येत होता. नाशिकमधील मालेगावातही मुस्लिम संघटनांनी बंद पुकरला होता. या बंदला सायंकाळी गालबोट लागले. आंदोलकांकडून रॅली दरम्यान दगडफेक करण्यात आली.
त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ आज मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला. दुपारपर्यंत सर्व बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली. मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते. मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि माघारी पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला.
दगडफेकीच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी अश्रू धुराच्या कांड्याचा वापर करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली असून यात काही नागरिक व पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
मालेगावातील दगडफेकीच्या घटनेवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही काहीही बरळतील. कोरोनानंतर आता कुठे आनंदी वातावरण आहे. कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांतता राखा. पोलीस त्यांचे काम करतील. आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलकांना केले आहे.
मालेगावातील तणाव परिस्थिती चिघळू नये. त्रिपुरातील पडसाद इथे कसे उमटू शकतात? असा सवाल करीत दुसऱ्या राज्यातील घटनेवर मालेगावात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून असे घडत आलं आहे जगात कुठे काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया देशात उमटते. त्रिपुरामध्ये मशीद का पाडली? ते अनधिकृत बांधकाम होत की नाही माहीत नाही. परंतु तिथल्या घटनेचे मालेगावात पडसाद उमटण्याचे कारण नाही. तिथे पोलिसांनी बळाचा वापर करू नये कारण तसे केले तर महविकास आघाडीच्या वोट बँकला धक्का बसेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
इतर बातम्या
Afghanistan Bomb blast: मशिदीत स्फोट, मौलवीसह 12 लोक जखमी, 3 मृत्यू
Pune crime|अंध व्यक्तीला लाखोंचा गंडा; लग्नानंतर सात महिन्यातच पत्नी दागिने व पैसे घेऊन पळाली