राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडून आता बराच काळ लोटला आहे. यानंतर आता अजित पवार गटातील काही नेते पुन्हा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी धावत आहेत. असं असताना नाशिकच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सत्तेत सहभागी होण्यामागचं कारण सांगितलं. तसेच आपण सत्तेत सहभागी झालो असलो तरी पक्षाची विचारसरणी सोडलेली नाही, असंही सुनील तटकरे म्हणाले आहेत. “अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन संकल्प घेऊन पक्ष राजकारणात उतरला. बळीराजाच्या जीवनात सुगीचे दिवस आणायचे असतील तर सत्तेमध्ये आपला सहभाग असावा. एनडीएमध्ये आम्ही सहभाग घेतला. मात्र आम्ही आमच्या मूळ विचारसरणीपासून बाहेर जाणार नाहीत”, असं सूचक वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे.
“महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही काही हजार कोटी रुपयांची कामे केली. कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन जे मिळते त्यात सिंहाचा वाटा माझ्या शेतकऱ्यांचा आहे. संविधान बदलले जाणार, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. कांदा उत्पादकांचा राग मतपेटीतून या लोकसभा निवडणुकीत बाहेर आला. देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले”, असं सुनील तटकरे म्हणाले.
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतून पंधराशे रुपये महिलांना मिळणार. शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष वीज बिल माफ केले. अजित दादांनी 46 हजार रुपये महिलांच्या लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केले. राज्यातील दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिना मिळणार. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टर मदत देणार. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले. अर्थमंत्री एखादी योजना जाहीर करतो. वित्त विभागाला याची माहिती असते. अजित दादांनी नऊ अर्थसंकल्प यापूर्वी मांडले. आत्ता दहावा अर्थसंकल्प मांडला. विरोधकांनी सातत्याने अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. 19 ऑगस्टला भाऊ बहिणींचा पवित्र रक्षाबंधन आहे. त्यादिवशी लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
“आम्ही ठरवले महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा काढायची. या महिनाभरामध्ये महाराष्ट्राचे वातावरण कमालीचे बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जनसंवाद यात्रा काढणार असून ती नाशिक जिल्ह्यातून सुरुवात होणार. या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीमागे बळ उभे केले”, असं तटकरे म्हणाले.
“दीड लाख महिला भगिनींचे अर्ज मंत्रालयाकडे उपलब्ध झाले. शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम कराल. छगन भुजबळ यांनी मांजरपाडासारखा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केला. येवला विधानसभा महत्त्वाची आहे. ती राजकीय आव्हान उभे करण्याचे प्रयत्न केले तरी तुम्ही ते हाणून पाडाल. नाशिक जिल्ह्यात सहा सदस्य पुन्हा घड्याळाचा चिन्हावर निवडून आणायचे आहेत. महायुतीच्या काळात सुरू झालेले योजना बंद पडतील, असा प्रचार केला जातोय. या योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा निवडून आणायचे आहे. छगन भुजबळ यांची ओळख महाराष्ट्रातील ग्रेट लिडरमध्ये होते. जनसंवाद यात्रा अजित दादांच्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचा प्रयत्न करूया”, असं आवाहन सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.