आमदाराची लग्नपत्रिका आणि डिव्होर्सपेपर भरसभेत दाखवले; सुषमा अंधारे आक्रमक

| Updated on: Dec 10, 2023 | 10:23 PM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ईडीवर जोरदार टीका केली. या ईडीला दुसरं कोणीच दिसत नाही. फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे लोक दिसतात. इतर लोकांच्यावेळी ईडीला रातांधळेपणा येतो. ते लोक त्यांना दिसत नाही. आदिवासींच्या जमिनीवर कब्जा झाला. हे ईडीला दिसत नाही का? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली.

आमदाराची लग्नपत्रिका आणि डिव्होर्सपेपर भरसभेत दाखवले; सुषमा अंधारे आक्रमक
Sushma Andhare
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोहर शेवाळे, मनमाड | 10 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज मनामाड येथील महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली. कांदे यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची पुरती पोलखोल केली. सुषमा अंधारे यांनी या सभेत आधी सुहास कांदे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखवलं. त्यानंतर सुषमा अंधारे या आमदार कांदे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर घसरल्या. अंधारे यांनी भरसभेत हजारो लोकांना कांदे यांची लग्नपत्रिका आणि डिव्होर्स पेपरही दाखवले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रे निमित्ताने मनमाडला आल्या होत्या. यावेळी एकात्मता चौकात त्यांची सभा पार पडली. या सभेतून सुषमा अंधारे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही घसरल्या. येताना माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. माझ्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना शंभर शंभर रुपये अधिकचे द्यायला हवे होते. पक्ष लक्षात ठेवा. कळप लांडग्यांचे असतात. वाघिण एकटी येते. माझी इच्छा नसतानाही तुम्ही हाताने संक्रात ओढवून घेतली आहे, असा इशाराच सुषमा अंधारे यांनी दिला.

सुहास कांदे डाकू

सुहास कांदे यांनी बाया कोण आणि कुणाच्या बाया आणल्या? मी सभ्य आणि सज्जन लेकरू आहे. तुम्ही विटाळ बाळगता. स्पृश्य आणि अस्पृश बाळगता. सुहास कांदे यांना कोणत्या जातीचा विटाळ होत ते सांगा. त्यांनी भान ठेवावं. विकासाची भाषा करताच ते विटाळाची भाषा करत आहेत. कांदे हे एक नंबरचे डाकू आहेत. (यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ दाखवला. त्या गुलाबराव पाटील कांदे यांना एक नंबरचा डाकू म्हणत असल्याचं दिसतं.)

मी त्यांना डाकू का म्हणाले? कारण पब्लिक त्यांना डाकू म्हणतेय. गुलाबराव पाटील त्यांना डाकू म्हणालेत. मी नाही म्हणाले, असं अंधारे म्हणाल्या. गोमुत्राने रस्ते धुण्याच्या विषयावरूनही त्यांनी टीका केली. विटाळ कसला आलाय ते सांगा. सुहास कांदे तुम्हाला कोणत्या जातीचा विटाळ होतोय? दम असेल तर रस्ता धुवून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

अजितदादा कुठून आले?

सुहास कांदे म्हणाले. आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मग आता कुठे आहेत कांदे? कोणाच्या मांडीला मांडी लावली. अजितदादा कुठून आले? झेकोस्लोव्हाकियावरून अजितदादा आले का?राष्ट्रवादीने तुम्हाला पायाजवळ बसवलं. याबद्दल सुहास कांदे चकार शब्द काढायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. तसेच, कांदे हे हिंदुत्वावर बोलतात. हिंदुत्वाची भाषा करतात. 2014 पर्यंत कांदे शिवसेनेत नव्हते. मग बाळासाहेबांनी यांना कधी हिंदुत्व शिकवले? असा सवाल त्यांनी केला.

कोणत्या विकासासाठी गुवाहाटीला गेला?

सुहास कांदे यांना मी भेटलेले नाही. 40 आमदारांचे माझे काहीही वाद नाहीत. काही खोक्यांसाठी हे लोक गेलेत. विकासासाठी गेले म्हणतात, मग काय विकास केला त्यांनी? 40 दिवसांनी मनमाडला पाणी येतं.
कुठल्या विकासासाठी गेले होते हे गुवाहाटीला?, असा सवाल त्यांनी केला.

गुलाल लागू देणार नाही

उद्धव ठाकरे यांच्या विश्वासावर सुहास कांदे निवडून आले. आता 2024 ला पाहू कांदे कसे निवडून येतात. 2024 ला तुम्हाला गुलाल लागू देणार नाही. काय खर्च करायचा करा. मी गुलाल लागू देणार नाही, असं सांगतानाच ही महाप्रबोधन यात्रा आहे. महाराष्ट्राला शिवसेनेची प्रचंड गरज आहे, असं त्या म्हणाल्या.