उमेश पारीक, पिंपळगाव बसवंत,नाशिक | 22 नोव्हेंबर 2023 : टोमॅटोला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळला आहे. पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या बाजार भाव वधारला. 20 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेट्सला सरासरी 531 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. परदेशात पण टोमॅटोला जोरदार भाव मिळाला. देशातील इतर राज्यातून टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली. त्याचा परिणाम टोमॅटोच्या किंमतींवर लागलीच दिसून आला. भाव वधारले.
असा मिळाला भाव
पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेट्सला सरासरी 531 रुपये दर मिळाला.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 89 हजार 373 कॅरेट टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोला जास्तीत जास्त 700 रुपये, कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 531 रुपये इतके 20 किलोच्या कॅरेट्सला दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. दिवाळीनंतर टोमॅटोने चांगलीच उचल खाल्ली.
देशासह परदेशात वाढली मागणी
यंदा पावसाने ओढ दिल्याने सर्वच पिकांवर परिणाम झाला. जुलै ते सप्टेंबरपर्यंत टोमॅटोला चांगला भाव मिळाला. उत्तर भारतात पावसाचा कहर झाला तर उर्वरीत भागात पावसाने डोळे वटारले होते. केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला आणि नेपाळमधून आयातीला परवानगी दिली. सध्या दुबई, ओमान, कुवेत तसेच बांगलादेश या आखाती देशात टोमॅटोची मागणी वाढली आहे. तर देशांतर्गत हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातून टोमॅटोच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
शेतकरी झाले होते मालामाल
जुलै, ऑगस्टमध्ये टोमॅटोच्या किंमतींनी कहर केला होता. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावेळी शेतकरी लखपतीच नाही तर करोडपती झाले. पुण्यातील एका शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून 2.8 कोटी रुपयांची कमाई झाली होती. शिरुर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पण मोठा फायदा झाला होता. त्यांनी कोट्यवधींची कमाई केली होती.
300 रुपयांवर पोहचल्या किंमती
जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमतीत मोठी उसळी दिसून आली. देशात टोमॅटोचे दर 300 रुपयेच नाही तर त्याच्याही पुढे गेले होते. जुलै महिन्यात टोमॅटोने महागाईत तेल ओतले. टोमॅटोच्या किंमतींमुळे महागाई जुलै महिन्यात 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचली. महागाईत टोमॅटोने थेट 7 टक्क्यांची भर घातली होती.