नाशिक : या वर्षातला सर्वात शेवटच्या दिवसाचा सूर्य अखेर मावळला आहे. आता नव्या वर्षाची नवी पहाट पुढच्या काही तासांमध्ये उजळणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने अनेकजण वेगवेगळे संकल्प करतात. कोणती तरी कला जोपासावी, कुठेतरी फिरायला जावं, देवदर्शनाला जावं, आयुष्यात आपण न केलेली एखादी गोष्ट करावी, असे वेगवेगळे संकल्प अनेकजण करत असतो. नव्या वर्षाच्या स्वागताचा एक वेगळा उत्साह असतो. हा उत्साह जगभरात असतो. त्यामुळे हे वातावरणच फार उत्साहाचं असतं. नववर्ष निमित्ताने अनेक भाविक देवदर्शनाला देखील जातात. पण तुम्ही नववर्ष निमित्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस भाविकांसाठी बंद राहणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिर 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 पर्यंत बंद राहणार आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार आहे. हे काम भारतीय पुरातत्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.