नाशिक : ठाकरे गटातील कुणीही शिंदे गटात जाणार नसल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलाय. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या बॅनरवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे फोटो झळकल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. हर्षदा गायकर या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रसारमाध्यमांसमोर पुढे येत सर्व चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं.
या सगळ्या सोडलेल्या अफवा आहेत. वातावरण डिस्टर्ब करण्यासाठी जाणीवपूर्वक या बातम्या पसरवल्या जात आहेत. उद्या-परवा सत्य समोर येईलच, असा दावा सुधाकर बडगुजर यांनी केला.
खासदार निधीतून विकास कामे झाले असल्याने त्या नगरसेविका ताईंनी आम्हाला विचारूनच कार्यक्रम केला. त्या ठाकरे गटातच राहणार आहेत. त्यांनी आपल्याला तसं सांगितलं असल्याचं बडगुजर यांनी स्पष्ट केलं.
आमच्या गटात एकमेकांशी मैत्रीपूर्ण वातावरण आहेत. तसेच आमच्यात सुसंवाद आहे, असंही ते म्हणाले.
एखाद्याला जायचे असेल, तर तो आरोप करून जाऊ शकतो. पण कुणीतरी लक्ष वेधून घ्यावं म्हणून नगरसेवक जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा दावा त्यांनी केला.