शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “विषय अनके आहेत. किती विषयांवर किती बोलायचं? पण काही गोष्टींवर आवर्जून बोलणं भाग आहे. मोदीजी सुद्धा आज नाशिकमध्ये होते. आता त्यांच्या खरंच मनावर एवढा ताण पडलाय, मध्ये कोणीतरी सांगितलं की, ते झोपतच नाही. झोपलं नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखं बोलायला लागतात. मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“या पावटेंना कुठे मोट फुटला ते मला माहिती नाही. इथपर्यंत मजल गेली की, हिंदुहृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि तेलंगणाच्या भाषणात हे मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट मागितलं? आणि तेवढी तुमची लायकीपण नाही. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाहीत. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे. त्यांना प्रश्न असा पडलाय, संपूर्ण फौज मोदींच्या बाजूने आहे, भाजपची तीनपाटापासूनची मोठी भांडीकुंडी वाजणारी त्यांच्याकडे आहेत, पण तरीही ते उद्धव ठाकरेला घाबरतात, कारण जनतेच्या रुपाने माझ्याभोवती शिवसेनाप्रमुख आणि माझ्या माँ साहेबांचं आशीर्वादाचं कवच आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी राजकारणाबाबत बोलतोय, कारण राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून त्यांना सगळी नकली संताने म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवर घ्यावे लागले. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री किती किंमतीचा असेल, हे सर्व नकली संताने कारण तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून त्यांनी आणखी एक नकली संतान मांडीवर घेतलं. ते तर फारच वाह्यात निघालं, प्रफुल्ल पटेल”, असा घणाघात ठाकरेंनी केला.
“काल महाराजांचा जिरेटोप, आज माझ्या शेतकऱ्याची गांधीटोपी, रोज टोप्या बदलणारा माणूस तुम्हाला पंतप्रधान पाहिजे? प्रफुल्ल पटेल यांना सांगतो, पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यावर माझ्या महाराजांचा जिरेटोप ठेऊ नका. मोदींची माझ्या महाराजांसोबत बरोबरी करायची पात्रता काय? महाराजांचं राज्य कसं चालत होतं? कुणी महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथे हातपाय तोडायचे. मग तो कुणीही असेल. मोदी काय करताय? मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. तिकडे जातच नाहीत. तिकडे जायची हिंमत नाही. ना मोदींची, ना अमित शाह यांची. जिथे माझे छत्रपती शिवाजी महाराज महिलेवर कुणी अत्याचार केला त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुम्ही जाऊ शकत नाहीत महाराजांच्या जिरेटोपाला हात काय, तुमची जिरेटोपचं दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सुनावलं.