रईस शेख, मनमाडः नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांना पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले आहे. नांदगाव तालुक्यात नको, नको म्हणतानाही एका बहाद्दराने पुराच्या पाण्यात गाडी घातली. शेवटी गंटागळ्या खाणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पाण्यात उड्या घेत वाचवले.
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर सुरू झाला आहे. नांदगाव, वडाळी गावाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वडाली – नांदगाव मार्गावर असलेला फरशीपुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. या पाण्यात एका तरुणाने दुचाकी घालण्याचा प्रकार केला. अर्धा पूल त्याने ओलांडला. मात्र, त्यानंतर पुराचे पाणी वाढले. त्यात तो गाडीसह पुराच्या पाण्यात पडला. गाडी वाहून जावू लागली. गाडीसोबत तरुणही पाण्याच्या प्रवाहात ओढला जाऊ लागले. अखेर पुलाकाठावर उभ्या असणाऱ्या तरुणांनी जीव धोक्यात घालून पाण्यात धाव घेतली आणि त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले.
पिकांचे अतोनात नुकसान
जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात नाशिककडे पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये विनाशक हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीके तर आडवी झालीच आहेत, सोबतच 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून, १०४ घरांची पडझड झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक पंचनाम्यात उघड झाले आहे. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले आहे.
कांद्याचे पीक आडवे
नांदगाव-मालेगावमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने कांद्याची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत. आता प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे. येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मका पीक घेतले. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. मका पिकात गुडघ्या इतके पाणी साचले. पीकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे याची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
इतर बातम्याः
कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा
नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी
अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; येवल्यातल्या शेतकऱ्यांची मागणीhttps://t.co/aRA6v8lRVV#Nashikdistrict|#Yeola|#heavyrains|#cropdamage|#farmers|#demandforhelp
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021