राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी भुजबळ आपल्या मतदार संघात पोहचले. येवल्यात त्यांनी समर्थक, कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
भुजबळ म्हणाले, काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण त्यांनी मला मंत्री केले नाही. परंतु मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे आपण नाराज नाही. मी पहिल्यांदा मी महसूल मंत्री झालो. आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणे सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो. त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो.
उद्या मी सर्वांचे म्हणणे ऐकून घेणार आहे मग बघू. निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका. ‘जहाँ नही चैना वहा नही रहना,’ असे सांगत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू. परंतु तुम्ही सोशल मीडियावर अजिबात काही चुकीचे टाकू नका. ज्यांनी आपले काम नाही केले आपण त्यांचे काम करायचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचे आहे.
छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि पवार साहेब होतो. मुंबईत जेव्हा दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो. तेव्हा दाऊद इब्राहिमचे नाव घ्यायला लोक घाबरात होते. त्यावेळी अमिताभ बच्चन, शाहरख खान सारखे स्टार मुंबई सोडून जाणार होते. मी त्यांना थांबवले. मुंबईमधील दहशत संपवली.