नवी मुंबई : कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच कोव्हिड 19 लसीकरणाकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून 16 जानेवारीपासून 3 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 3 लाख 6 हजार 726 नागरिकांनी कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 97 हजार 176 नागरिकांनी दुसराही डोस घेतलेला आहे. अशाप्रकारे एकूण 4 लक्ष 3 हजार 902 कोव्हिड डोसेस देण्यात आलेले आहेत. (Navi Mumbai City 3 Lakh people Corona Vaccinated)
महानगरपालिका क्षेत्रात वाशी, नेरूळ व ऐरोली ही 3 रूग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, 23 नागरी आरोग्य केंद्र तसेच ग्रोमा सेंटर एपीएमसी मार्केट दाणा बझार, भाजी मार्केट, रेल्वे कॉलनी हेल्थ युनिट जुईनगर त्याचप्रमाणे ईएसआयएस हॉस्पिटल सेक्टर 5 वाशी व विष्णुदास भावे नाट्यगृह या 2 ठिकाणी जम्बो सेंटर आणि इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रँड सेंट्रल मॉल सीवूड नेरूळ येथील ड्राईव्ह इन लसीकरण अशा 34 लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाला वेग दिला जात आहे.
सध्या शासन स्तरावरून महानगरपालिकेस प्राप्त होणा-या लसींच्या पुरवठ्यानुसार दररोजच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असून त्यास नागरिकांच्या माहितीसाठी विविध माध्यमांचा वापर करून व्यापक प्रसिध्दी दिली जात आहे. लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी 4 लाख लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडरही प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
अशाप्रकारे 29 मे पर्यंत एकूण 3 लक्ष 6 हजार 726 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले असून लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने विविध भागांतील शाळा, बहुउद्देशीय इमारतींमध्येही लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. दिवसाला 25 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेली असून लसीकरणाला वेग देत कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी 31 जुलैपर्यंत 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस देऊन पूर्ण होईल अशाप्रकारे कार्यवाही सुरु आहे.
(Navi Mumbai City 3 Lakh people Corona Vaccinated)
हे ही वाचा :
नवी मुंबईत विशेष कोव्हिड लसीकरण सत्र, दिव्यांग, निराधार, व्याधीग्रस्त महिलांसाठी खास सुविधा
नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव द्यावं; रामदास आठवले मैदानात