नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये ओडीएफ कॅटेगरीमध्ये ओडीएफ डबल प्लसच्या पुढील सर्वोच्च “वॉटरप्लस मानांकन” नवी मुंबई महानगरपालिकेस जाहीर झाले असून वॉटरप्लस मानांकन संपादन करणारे “नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर” आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये देशातील तृतीय आणि महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ ला सामेर जाताना “निश्चय केला – नंबर पहिला” हे ध्येय निश्चित करुन नवी मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने महानगरपालिका सर्वेक्षणाला सामोरी गेली आहे. यामध्ये हागणदारीमुक्त शहरांच्या (ओडीएफ सिटी) श्रेणीमध्ये सर्वोच्च असणारे “वॉटरप्लस” हे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारमार्फत जाहीर झाले असून सर्वोच्च ‘वॉटरप्लस मानांकन’ मिळविणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव व देशातील 4 शहरांमधील एक शहर आहे.
नवी मुंबईस मिळालेला हा सन्मान प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असून याचे संपूर्ण श्रेय नागरिकांचे आहे, असे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ चे सर्वेक्षण करताना ओडीएफ कॅटॅगरीमध्ये स्वच्छता विषयक विविध बाबींची केंद्रीय पथकामार्फत बारकाईने पाहणी करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षणाची कार्यपध्दती अवलंबली जात असल्याने परीक्षण पथकाने शहरातील विविध भागांची तपासणी केली. यामध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या तपासणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शहरात दररोज निर्माण होणाऱ्या 100 टक्के म्हणजेच 380 द.ल.लि. सांडपाण्यावर अत्याधुनिक सीटेक तंत्रज्ञानावर आधारीत 7 मलप्रक्रिया केंद्राव्दारे प्रक्रिया करीत असून या मलप्रक्रिया केंद्रांची क्षमता सध्याच्या सांडपाण्याच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळेही 95 टक्के इतके इतर शहरांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याचा बीओडी 5 पेक्षा कमी असून हे प्रक्रियाकृत चांगल्या दर्जाचे पाणी उद्यानांमधील हिरवळ व झाडे फुलविण्यासाठी तसेच रस्ते, दुभाजक व पदपथ स्वच्छ करण्यासाठी त्याचप्रमाणे एनआरआय सारख्या संकुलांना पिण्याव्यतिरीक्त पाण्याच्या वापरासाठी दिले जात आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले स्वच्छ रहावे याकरिता वार्षिक नालेसफाई करण्याप्रमाणेच नाल्यामध्ये नागरिकांकडून कचरा टाकला जाऊ नये याकरिता नाल्यांवरील पुलांच्या काठांवर उंच जाळ्या लावण्यात आल्या असून नाल्यांमध्येही स्क्रीन लावून कचरा अडवला जात आहे आणि त्याची नियमित सफाई केली जात आहे.
शहरामध्ये काही ठिकाणी असलेल्या सेप्टीक टॅंकची सफाई अत्याधुनिक वाहनांद्वारे केली जात असून त्यातील स्लज सफाईनंतर लगेचच मलप्रक्रिया केंद्रात पुढील प्रक्रीयेसाठी घेऊन जाण्याची नियमित प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. हे काम करणाऱ्या स्वच्छता मित्रांना सर्व सुरक्षा साहित्य देण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला ओडीएफ डबल प्लस हे मानांकन यापूर्वीच प्राप्त झाले असून शहर हागणदारीमुक्त रहावे याकरिता महानगरपालिका अत्यंत दक्ष आहे. गुड मॉर्निंग पथकांद्वारे याकडे बारकाईने लक्ष दिले जात असून शहरात 394 कम्युनिटी शौचालये, 220 सार्वजनिक शौचालये, 20 ई-टॉयलेट्स तसेच महिलांकरिता 6 विशेष She-टॉयलेट्स उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय, झोपडपट्टी भागातील बैठ्या घरांमध्ये 5,094 घरगुती शौचालयांचीही अनुदान देऊन निर्मिती करण्यात आलेली आहे.
महिलांच्या शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिनची सुविधा करण्यात आलेली असून स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक लिक्विड सोप, वॉश बेसीन आणि इतर साहित्य पुरविण्याबाबत महानगरपालिका दक्ष आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शौचालयांच्या जागा गुगल मॅपवर सहजपणे शोधता येतात. प्रत्येक शौचालयाला क्युआर कोड बेस्ड प्रतिसाद प्रणाली बसविण्यात आलेली असून याव्दारे नागरिकांमार्फत शौचालयाच्या स्वच्छतेवर प्रतिक्रिया देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक शौचालय नियमित स्वच्छ असावे याकरिता शौचालय स्वच्छतेच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असून शौचालयांमध्ये दिव्यांगांकरिता आवश्यक व्यवस्था तसेच मुलांकरिता बेबी टॉयलेटचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शासनामार्फत स्वच्छता प्रतिसाद प्राधिकारी म्हणून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली असून आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांचेकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासूनच स्वच्छतेबाबत अत्यंत जागरुकतेने पावले उचलत असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांचे नेहमीच सक्रीय सहकार्य राहिले आहे. त्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेला ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये ओडीएफ कॅटॅगरीतील सर्वोच्च “वॉटर प्लस” मानांकन लाभले असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या मानांकनाबद्दल समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करीत स्वच्छता ही नियमित राखण्याची गोष्ट असल्याने हे मानांकन टिकविण्यासाठी आपण नेहमीच सतर्क राहूया असे आवाहन केले आहे.
पनवेल मनपा सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करणारhttps://t.co/XmOkBZWlFD#Panvel #SucurityGuard #CoronaVaccine #VaccinationDrive
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
संबंधित बातम्या :
CIDCO | कोव्हिड योद्ध्यांसाठी सिडकोची घरे कमी आणि नोंदणी जास्त