नवी मुंबई : मुंबई महापालिका पाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका देखील कोरोना प्रतिबंधक लसींसाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड मोठा आहे. याशिवाय दररोज हजारो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील भीती आहे. या सर्वांवर लसीकरण हाच एक रामबाण उपाय आहे. मात्र, राज्यात सध्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला अनेक ठिकाणी ब्रेक लागला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने आता कोरोना प्रतिबंधक लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे (After BMC Navi Mumbai Municipal Corporation also float global tender for purchase of Corona vaccines).
नवी मुंबईत सध्या लसीकरणात अडथळे
नवी मुंबईत 6 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला डॉक्टर, नर्सेस अशा आरोग्यकर्मींना लसींचा डोस देण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पोलीस, सुरक्षाकर्मी असे पहिल्या फळीतील कोरोना योद्धे, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील व्यक्ती आणि त्यानंतर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 355 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. पण सध्या लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरणाच्या गतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यापूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांचे लसीकरण व्हावे, याकरिता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नियोजित केले आहे. याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करून लवकरात लवकर लस खरेदी करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
नवी मुंबईत 8 लाख 29 हजार नागरिकांना अद्याप पहिला डोसही मिळाला नाही
नवी मुंबईची लोकसंख्या साधारणत: 15 लाख आहे. यामध्ये 18 वर्षांवरील नागरिकांची अंदाजित 10 लाख 80 हजार इतकी लोकसंख्या विचारात घेता आत्तापर्यंत 2.51 लक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील 58 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा रितीने साधारणत: 8 लाख 29 हजार नागरिकांचे प्रथम डोसचे लसीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त लसींचा पुरवठा लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण होण्याच्या दृष्टीने सदर लस खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.
ग्लोबल टेंडरमुळे लसीकरणात होणारा विलंब टाळता येईल
1 मे 2021 च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना लस उत्पादकांनी एकूण उत्पादन केलेल्या लसीचा 50 टक्के साठा केंद्र सरकारला दिला जात आहे. उर्वरित लस राज्य शासन, खाजगी संस्था आणि कंपन्यांना देण्यात येत आहे. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त लस पुरवठा लक्षात घेता नागरिकांच्या लसीकरणात होणारा विलंब या लस खरेदीमुळे टाळला जाईल.
या सर्व गोष्टींचा विचार करूनच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सद्यस्थितीत 4 लाख लसींचे डोस खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हेही वाचा : मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी