नवी मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : ईडीने (Enforcement Directorate) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील ऊर्फ विवेक पाटील (Vivek Patil) यांना ईडीने जोरदार दणका दिला आहे. ईडीने बँक घोटाळ्याप्रकरणी पाटील यांची 152 कोटींची संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. पनवेल येथील ही कर्नाळा नागरी सहकारी बँक आहे. या बँकेत 512 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे पनवेलमध्ये (Panvel) एकच खळबळ उडाली आहे. विवेकानंद शंकर पाटील हे माजी आमदार आहेत. चारवेळा ते पनवेलमधून निवडून आले होते.
पीएमएलए कायद्यांतर्गत आदेश काढल्यानंतर ईडीने ही संपत्ती तात्पुरती जप्त केली आहे. त्यात विवेक पाटील यांचा बंगला, रहिवाशी संकूल आणि भूखंड आदींचा समावेश आहे. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाकडून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते पनवेलच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचं मूल्य 152 कोटी रुपये आहे. पाटील, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कोऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडशी ही मालमत्ता संबंधित असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं.
जून 2021 मध्ये विवेक पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाटील यांच्यासह इतर 75 जणांवर एफआयआर दाखल केला होता. त्यावरच ईडीची ही केस आधारीत आहे. तसेच 2019-2020मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यावर ऑडिटही करण्यात आलं होतं.
ED has provisionally attached immovable properties belonging to Vivekanad Shankar Patil, a four-time MLA from Shetkari Kamgar Paksha Party and Ex- Chairman of Karnala Nagari Sahakari Bank Ltd, Panvel, his relatives and Karnala Mahila Readymade Garments Cooperative Society… pic.twitter.com/4gdqRTkZCw
— ED (@dir_ed) October 12, 2023
ऑडिट केल्यानंतर पाटील यांनी 63 बोगस अकाऊंटच्या माध्यमातून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा कर्ज खात्यांतून पैसा काढल्याचं उघड झालं होतं. 2019मध्ये याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने एफआयआर दाखल केला होता. त्याआधारेच ईडीने चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही या बँकेत एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. विवेक पाटील यांनीच हा घोटाळ्याचा केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. बेनामी खातेदारांच्या नावाने हा घोटाळा राजरोसपणे सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही या घोटाळ्याचं प्रकरण लावून धरलं होतं. या प्रकरणात चौकशी केली जात नाही. चालढकल केली जातेय असं भाजप नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची एन्ट्री झाली होती.