मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावलीय. त्याआधी ढगांचा जोरदार गडगडाट नोंदवला गेला. रायगड, नवी मुंबईत मुसळधार पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने अनेकांची तारांबळ उडवली. ढगांच्या गडगटासह झालेल्या मुसळधार पावसाने गणेशभक्तही सुखावले आहेत. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2022) मुहूर्तावर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने कमबॅक केलंय. हवामान विभागाने (weather Alert) वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली असून पुढील तीन दिवस पावसाचा मुक्काम असाच कायम राहणार आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे अनेक गणेशभक्तांचा हिरमोडही झाला. उत्तर पुणे आणि अहमदनगरमध्ये जोरदार वादळी पाऊस झालाय. हा वादळी पाऊस वेगाने नवी मुंबई, रायगडच्या दिशेने सरकत असून येत्या काही तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
29 ऑगस्ट रोजी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे गडगडाटासह महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलीय. पुणे, अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचे हेच ढग वेगाने रायगड, मुंबईच्या दिशेने सरकत असल्याचं पाहायला मिळालंय.
29/08,राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता. बहुतेक ठिकाणी ? दुपार नंतरच.
अन्य ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, मुंबई ठाणे सहीत ..
IMD pic.twitter.com/Ej0Hq5FwRi— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही कालपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या चाकरमन्यांनाही पावसाने सुखद धक्का दिलाय.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले. पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. लाडक्या बाप्पाच्या आगमनासोबत वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार आहे.
दुसरीकडे पिंपरी चिंचवड, मावळ मध्येही ऐन गणेश चतुर्थी च्या दिवशी वरून राजाने जोरदार हजेरी लावली.यामुळं गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणाऱ्या गणेश भक्तांची तारांबळ उडाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आज पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून सकाळ पासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय