नवी मुंबई : इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. नवी मुंबईत सकाळी ते सायकल चालवत होते. त्यावेळी वेगात आलेल्या टॅक्सीने त्यांच्या सायकलला धडक दिली. यात अवतार सैनी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. बुधवारी पहाटे 5.50 च्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाला. नेरुळच्या पाम बीच रोडवर अवतार सैनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत सायकल चालवत होते. त्यावेळी ही अपघात झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अवतार सैनी 68 वर्षांचे होते.
टॅक्सी चालकाने मागून येऊन सैनी यांच्या सायकलला धडक दिली. अपघातानंतर ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. सायकलचा मागचा भाग टॅक्सीच्या पुढच्या चाकांखाली आला. या अपघातात अवतार सैनी यांना गंभीर मार लागला. सहकारी सायकलस्वार त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
प्रोसेसरची डिजाइन बनवण्यात महत्त्वाची भूमिका
अवतार सैनी चेंबूरचे रहिवासी होते. त्यांनी इंटेल 386 आणि 486 मायक्रोप्रोसेसरच्या निर्मितीवर काम केलं होतं. कंपनीच्या पेंटियम प्रोसेसरची डिजाइन बनवण्याच नेतृत्वही त्यांनी केलं होतं. पोलिसांनी आरोपी टॅक्सी ड्रायव्हर विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवलाय. 279 (बेदरकारपणे वाहन चालवण), 337 (मानवी जीव संकटात टाकण) कलम 304-अ या कलमांखाली गुन्हा नोंदवलाय.