नवी मुंबई (रवी खरात) : “शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी” असं मोठ वक्तव्य शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी केलय. त्यांनी अजित पवार गटाचे नेते महेश शिंदे यांच्यावर टीका केली. “आम्ही अपात्र होणार म्हणून स्वप्न बघणारेच अपात्र होतील” अशी महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं. “शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही. त्यांच्यामुळे राजकारणात आलो. त्यांच्यामुळे पद मिळालं. त्यांच्यासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी आहे” असं शशिकांत शिंदे म्हणाले.
“निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी. न्यायालय त्यांना 100 टक्के अपात्र ठरवेल. पण असं झालं नाही, तर जनतेच्या दरबारात ते अपात्र ठरतील. हे मी जाहीररित्या सांगतो, त्यांनी माझ्या अपात्रतेची काळजी करु नये” असं शशिकांत शिंदे म्हणाले. “आम्ही निष्ठावान आहोत. त्याग करण्याची आमची तयारी आहे. पक्ष निष्ठा बाजूला ठेवली. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलं. त्या जनतेशी गद्दारी करुन खोक्यांसाठी तिथे गेलात. येणाऱ्या निवडणुकी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरेल व तुम्हला पराभूत करेल” असं शशिकांत शिंदे म्हणाले.
‘अशी वेळच येणार नाही’
“पण अशी वेळच येणार नाही. त्याआधी न्यायालय व विधानसभा अध्यक्षच तुम्हाला अपात्र ठरवतील” असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. “आज नवी मुंबईत महाराष्ट सदन उभ राहतय याचा आनंद आहे. माथाडी कामगारांना घर द्या, बोर्डाच्या माध्यमातून द्या. नाशिकच्या कामगारांचे पैसे कपात केले आहेत. माथाडींना कायद्यातून सूट मिळाली पाहिजे” अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.